Monday, November 17, 2025

बदलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

बदलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

बदलापूर  : ''माझ्या नेत्याला जर कोणत्या पदावरून राजीनामा द्यावा लागत असेल, तर त्यांच्या सन्मानार्थ मीसुद्धा शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.'' ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बदलापूर शहर अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता उघड झाला आहे. काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी वरिष्ठ नेतृत्वावर थेट गंभीर आरोप करून राजीनामा दिला.

त्यांचे समर्थन करत काँग्रेसचे बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव यांनीदेखील राजीनामा दिला आहे. जाधव यांनी आरोप केला आहे की ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निर्णयात प्रदेश पातळीवरील सामील करून घेतले नाही. प्रदेश पातळीवर पैसे घेऊन पदे विकण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू असून व्यापार होत आहे. सध्याच्या काळात काँग्रेसचे अस्तित्वही जाणवत नाही त्यामुळे काँग्रेसची लोक पक्ष सोडून इतर ठिकाणी जाताना दिसतात अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडी कुणाची तरी सुपारी घेऊन काम करत आहे

कुळगाव – बदलापूर नगर परिषद निवडणुकीत २४ प्रभागांमध्ये आठ पक्ष मिळून आघाडी केली होती. त्यातील २३ जागांवर एकमत झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कधी आम्ही दोन पावले मागेही आलो; परंतु काँग्रेसचा पारंपरिक असलेल्या बदलापूर गाव या वाॅर्डात आमच्या सीटवर उबाठाने दावा केला आहे. वास्तविक पाहता नगराध्यक्ष पद उबाठा किंवा मनसे यांनी घ्यावे असे आमचे ठरले होते.

४८ नगरसेवकांमध्ये एकही नगरसेवक मुस्लीम नसेल, तर यांना फक्त मुस्लिमांची मते हवी आहेत का हा चुकीचा मेसेज जाईल तसेच याचा परिणाम निवडणुकांवर होईल. या ठिकाणी चारही पक्षाची ताकद सारखीच आहे कोणाची कमी, किंवा कोणाची जास्त नाही आणि जर कोणाची जास्त असेलच तर ते वैयक्तिक निवडणुका लढले नाही. त्यामुळे कुणाची तरी सुपारी घेऊन काम करण्याचे काम महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केले.

Comments
Add Comment