
सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण
मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे. यात भारतानं खूप काही केलं आहे, याला इतिहास साक्षीदार आहे. मी पश्चिमेकडील एका लेखकाचा लेख वाचला. ज्यांनी लिहिलं होतं की, विश्वानं पूर्वेकडे पाहिलं पाहिजे मुख्यतः भारताकडे आणि त्याच्या प्राचीन धर्मग्रंथांकडे पाहिलं पाहिजे. त्या लेखकानं दोन महत्त्वाची नावं देखील घेतली होती. त्यामध्ये पतंजली आणि वशिष्ठ यांच्या नावचा समावेश आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य देशाचा दाखला दिल्यानंतरच आपण ते स्वीकारतो किंवा टाळ्या मिळतात. पण, प्राचीन धर्मग्रंथांची भारताला मोठी परंपरा लाभली आहे.
ती आपण जोपासली पाहिजे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.मुंबईत भागवत यांच्या हस्ते 'आर्य युग विषय कोशा'चे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मोहन भागवत बोलत होते. "पाश्चिमात्य देशातील ज्ञान आणि पुस्तकी भांडार समजून घेणे, ही चुकीची बाब नाही. पण आमचे ग्रंथ, सभ्यता, ज्ञानसाधना आणि परंपरा हेच आमचे अस्तित्व आहे. त्यामुळे भारताला आपले मूळ, प्राचीन विद्या, विचार कायम ठेवत आधुनिकता बरोबर ताळमेळ ठेवावा लागेल," असे त्यांनी सांगितले.