बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे
मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या प्रस्तावित पुनर्विकासामुळे मच्छीमार व मासळी विक्रेत्यांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज कोळी बांधवांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे पदाधिकारी, मासळी विक्रेते व संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयातून लोकमान्य टिळक महापालिका मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मंत्री श्री राणे यांनी दिले.
लोकमान्य टिळक महापालिका मार्केट प्रामुख्याने मच्छीमार व मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायाशी संबंधित आहे. येथे ५११ परवानाधारक व्यवसायी असून त्यापैकी १९९ मासे विक्रेते आहेत. सर्वसाधारण व्यावसायिक क्लस्टर पुनर्विकास केल्यास त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
कोळी बांधवांनी या मार्केटसाठी स्वतंत्रपणे पुनर्विकास योजना राबवावी, तसेच पुनर्विकासाच्या काळात स्वच्छता, निचरा, पाणीपुरवठा, साठवण व्यवस्था आदी मूलभूत सुविधांची हमी द्यावी, अशी मागणी केली. या विषयावर मंत्री श्री राणे यांनी हस्ताक्षेप करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी अशी विनंती कोळी बांधवानी यावेळी केली. त्यावर मंत्री श्री राणे यांनी कोळी बांधवांच्या समस्या समजून घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत तातडीने चर्चा करून या विषयावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. महानगरपालिका आयुक्त तसेच महापौर यांच्याशी या विषयावर चर्चा करून योग्य तो समन्वय साधण्याचे निर्देश श्री राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोळी समाजाच्या हिताला बाधा न येता पुनर्विकासाचा मार्ग काढला जाईल, तसेच मच्छीमार व मासळी विक्रेत्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही आश्वासन श्री राणे यांनी यावेळी कोळी बांधवांना दिले.






