Thursday, October 16, 2025

दिवाळी प्रकाशपर्व... सांस्कृतिक व अध्यात्मिक

दिवाळी प्रकाशपर्व... सांस्कृतिक व अध्यात्मिक

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे

दिवाळी... सर्व सणांमधला सगळ्यात महत्त्वाचा सण. याला सणांचा राजा म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आपल्या हिंदू धर्मातील संस्कृतीमध्ये तसं तर सगळ्या सणांचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे. प्रत्येक सणामागे अध्यात्मिक अर्थ आहे. पण दिवाळी हा सण सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. पाच दिवसांचा हा सण एक वेगळंच चैतन्य आणि उत्साह घेऊन येतो. पणत्यांच्या रांगा, दिव्यांची रोषणाई, विविध धाटणीचे कंदील, फटाक्यांची आतिषबाजी आणि नाकात दरवळणारा फराळाचा सुगंध मनामध्ये आनंदाचे उधाण घेऊन येतो. सर्वत्र उत्साहाचे वारे वाहू लागतात. दिवाळी नुसता सण नसून तिला सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक अशा विविध पैलूंची किनार आहे. दिवाळी समाजात ऐक्याची भावना जागृत करते. ही अशी संस्कृती व परंपरा आहे जी पिढ्यानपिढ्या हिंदूंच्या मनात चैतन्य आणि प्रकाशाचा झोत निर्माण करते. भले तिचं स्वरूप पिढी दर पिढी बदललेलं का असेना. आता हेच पाहा ना... गावाकडे आजपासून तीस-चाळीस वर्षांपूर्वीची दिवाळी फार वेगळी होती. जवळ जवळ पंधरा-वीस दिवस आधीपासूनच दिवाळीच्या तयारीला सुरुवात व्हायची. दिवाळी येणार म्हणून नवीन अंगण तयार करण्यासाठी गावाबाहेरच्या टेकड्यांवरून मुरूम आणि तांबडी माती आणली जायची. अंगण कुदळीने खणून मुरूम व तांबडी माती घालून पाणी शिंपडले जायचे आणि धोपटण्याने चोपून चोपून अंगण तयार केले जायचे. तिथेच बाजूला रांगोळी काढण्यासाठी चौकोनी छोटा ओटाही बनवला जायचा.

अंगण शेणाने छान सारवले जायचे आणि ओटाही तांबड्या गेरूने सारवला जायचा. घरीच आकाशकंदील बनवला जायचा. दिवाळी येण्याच्या दोन दिवस आधीपासूनच संपूर्ण घर दिवाळीच्या स्वागतासाठी सज्ज व्हायचं. चुणा थोड्या पाण्यात कालवून चुण्याच्या ठिपक्यांची रांगोळी काढली जायची. तसेच दरवर्षी नवीन रांगोळीचे पुस्तक आणून कोणत्या दिवशी कोणती रांगोळी काढायची हे आधीपासूनच घरातील आणि आजूबाजूच्या मुली ठरवून ठेवायच्या. मग प्रत्येकीकडे सगळ्या जाऊन एकमेकींना रांगोळी काढायला मदत करायच्या. घराघरांतून दिवाळी फराळाचा खमंग सुवास दरवळायचा. दिवाळीला रोज अभ्यंगस्नानासाठी उठणं म्हणजे लहानग्यांसाठी मोठं दिव्यच असायचं. कारण थंडीचे दिवस असल्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना म्हटलं की कडाक्याची थंडी असायची. पहाटे तुळशीपुढे आणि अंगणात पणत्या लावल्या जायच्या आणि पाट मांडून त्यावर प्रत्येकाला बसवून उटणे लावले जायचे. स्नान करून आल्यावर ‘कारंट’ डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडण्याची प्रथा आहे. श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध याच दिवशी केल्यामुळे त्याच्या वधाचे प्रतीक म्हणून हे कारंटे गोविंदा गोपाळा म्हणत फोडले जाते. सगळ्यांचे अभ्यंगस्नान झाल्यानंतर देवपूजा करून देवाला फराळाचा नैवेद्य दाखवला जायचा आणि मग सगळेजण एकत्र बसून फराळ करायचे. आता जरी अंगणाची जागा कोबा किंवा पॅसेजने घेतली असली, ठिपक्यांचा कागद आणि ठिपक्यांची रांगोळी कालौघात मागे पडून झटपट रांगोळीसाठी छाप आले असले, अभ्यंगस्नान भल्या पहाटेऐवजी पहाटे (सहाच्या दरम्यान) बिना कारंट फोडून होत असलं, विकतचा कंदील, विकतचा फराळ जरी घरात येत असला, थंडी सुद्धा कडाक्याची पडत नसली ना तरीही दिवाळीचा तोच उत्साह, तेच चैतन्य अजूनही पूर्वीसारखंच आहे. फक्त तिचं स्वरूप बदलले आहे. काळ कितीही बदलो, पण काही लोक मात्र ही दिवाळी पारंपरिक पद्धतीने मोठ्या धूमधडाक्यात दरवर्षी साजरी करतात. आपल्या पारंपरिक संस्कृतीशी घट्ट नातं त्यांनी अजूनही जपलं आहे. दिवाळीचं जसं सांस्कृतिक महत्त्व आहे ना तसंच तिच्या अध्यात्मिक स्वरूपाचं महत्त्व देखील तितकच महत्त्वाचं आहे. दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय मिळविणारे एक प्रकाशपर्व आहे. म्हणूनच आपल्या अंतर्मनातील अंधार दूर करण्यासाठी आपल्या मनात एक आत्मज्ञानाचा दिवा लावला पाहिजे. या आत्मज्ञानाच्या प्रकाशात वासना, क्रोध, लोभ, द्वेष, आसक्ती, अहंकार आणि आळस यासारख्या अंधाराला जाळून टाकून प्रेम, शांती, समाधान, नम्रता यांना अध्यात्मिक भावनांचे कोंदण लावले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्यामध्ये जर आत्म्याचा दिवा लावला तर आत्म्याचा प्रकाश जागृत झाल्यानंतर प्राप्त होणारा आनंद हा निश्चितच अवर्णनीय असेल यात शंका नाही.

हिंसा, वासना, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, कर्तव्याचा अभाव, मलिनता, स्वार्थ, लबाडी, अप्रामाणिकता, अन्याय, अहंकार, भ्रष्टाचार इत्यादींचा अंधार सर्वत्र पसरलेला असताना दिवाळी हा पारंपरिक सण एकमेकांमधील मतभेद विसरून सर्वांना आपली हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती, परंपरा अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करायला लावतो. दिवाळी सणाने आता धर्म मर्यादा ओलांडून त्याने राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त केले आहे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे, तर अशा उद्यावर येऊन ठेपलेल्या दिपोत्सवाच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा. युवा पिढीचे भविष्य उज्ज्वल होवो, ज्येष्ठांना निरोगी स्वास्थ्य लाभो व सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत याच दिवाळीनिमित्त सर्वांना अनंत शुभेच्छा! आपणा सर्वांना यंदाची दीपावली सुखा समाधानाची, आनंदाची व भरभराटीची जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

Comments
Add Comment