
तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करत, कंपनी कायमची बंद करण्याची घोषणा केली. श्रीसन फार्मा कारखान्यात ३५० हून अधिक गंभीर अनियमितता आढळल्या.
कोल्ड्रिफ सिरप प्यायल्याने मध्य प्रदेशात आतापर्यंत २५ मुलांचा मृत्यू झाला. चेन्नईतील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी श्रीसन फार्माशी संबंधित सात ठिकाणी छापे टाकले. श्रीसन फार्माचे प्रमुख कर्मचारी आणि तामिळनाडू अन्न आणि औषध प्रशासन (टीएनएफडीए)चे अटक केलेले प्रभारी संचालक पी. यू. कार्तिकेयन यांच्या जागेवरही छापे टाकण्यात आले. कार्तिकेयन यांना जुलै २०२५ मध्ये लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. भेसळयुक्त कोल्ड्रिफ सिरपच्या उत्पादन आणि विक्रीशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात पीएमएलए अंतर्गत ईडीकडून कारवाई केली.
दरम्यान, मध्य प्रदेश पोलीस रविवारी मुख्य आरोपी, श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना घेऊन तामिळनाडूला रवाना झाले. त्यांना ९ ऑक्टोबर रोजी चेन्नईमधून अटक करण्यात आली होती.