Thursday, September 18, 2025

IND vs PAK : हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला!

IND vs PAK : हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला!

मुंबई : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार देणे  (handshake controversy) हा एक मोठा मुद्दा बनला. पीसीबीने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर खापर फोडले की, त्यांनी दोन्ही संघांना हस्तांदोलन करू नका, असे सांगितले. परंतु आता एक वेगळाच खुलासा समोर आला आहे.

हाती आलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची काहीही चूक नाही. कारण त्यांनी त्यांना दिलेल्या आदेशांचे पालन केले. अँडी पायक्रॉफ्ट यांनी आशियाई क्रिकेट परिषदेनेच आदेश दिले होते की भारत आणि पाकिस्तानच्या कर्णधारांनी टॉस दरम्यान हस्तांदोलन करू नये.

भारत-पाकिस्तान सामन्याच्या एक दिवसानंतर १५ सप्टेंबर रोजी पीसीबीने आयसीसीला ईमेल पाठवून आरोप केला की मॅच रेफ्रीने टॉस दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. आयसीसीने ताबडतोब या प्रकरणाची चौकशी केली आणि पीसीबीला ईमेलद्वारे उत्तर दिले की पायक्रॉफ्टने आपली कर्तव्ये चांगली पार पाडली आहेत आणि आचारसंहितेचे उल्लंघन केले नाही.

ईमेलमध्ये असेही म्हटले आहे की, ते टॉस दरम्यान हस्तांदोलन न करण्याबाबत एसीसीच्या सूचनांचे पालन करत आहे. आता यातील महत्त्वाची बाब अशी की, एसीसीचे अध्यक्ष हे स्वतः पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी आहेत. जर एसीसीने हा आदेश जारी केला असेल तर मोहसिन नक्वी हेच या हस्तांदोलन वादाला थेट जबाबदार आहेत.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ईमेलमध्ये आयसीसीने पायक्रॉफ्ट यांचे कौतुक केले आहे की, त्यांनी हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळले आणि कोणत्याही विचित्र घटना होणे टाळले.

तसेच १७ सप्टेंबर रोजी पीसीबीने आणखी एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान आणि नंतर कोड उल्लंघन झाल्याचे म्हटले होते आणि पुन्हा मॅच रेफरीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. प्रत्युत्तरात, आयसीसीने पीसीबीकडून अधिक माहिती मागितली, जी अद्याप देण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment