
दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी केवळ १२८ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने पाकड्यांचे हे आव्हान ७ विकेट आणि २५ चेंडू राखत पूर्ण केले. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ९ बाद १२७ धावा केल्या होत्या.
पाकिस्तानचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दणक्यात सुरूवात केली होती. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने आल्यापासून पाकिस्तानच्या गोलंदाजांना झोडायला सुरूवात केली. तर गिलही तशाच प्रकारे धुवत होता. सलामीवीर शुभमन गिलच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. तो १० धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा ३३ धावा करून बाद झाला. तिलक वर्मानेही ३१ धावांची खेळी केली. मात्र सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने शेवटपर्यंत टिकून पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात नाबाद ४७ धावा ठोकल्या.भारतीय संघाने चांगली सुरुवात करून पाकिस्तानला सुरुवातीचा धक्का दिले. हार्दिक पंड्याने सॅम अयुबला बाद केले आणि जसप्रीत बुमराहने मोहम्मद हरिसला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाच चेंडूत तीन धावा काढून हॅरिस बाद झाला. अशाप्रकारे पाकिस्तानने सहा धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स गमावल्या होत्या. सुरुवातीच्या अपयशानंतर फखर जमान आणि साहिबजादा फरहान यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळला. या दोघांच्या फलंदाजीमुळे पॉवरप्लेच्या अखेरपर्यंत पाकिस्तानने दोन विकेटसाठी ४२ धावा केल्या. भारताने चांगली सुरुवात केली आणि पाकिस्तानला दोन धक्के दिले. पण फखर आणि साहिबजादा यांनी काही चांगले फटके मारून डाव सांभाळला.
अक्षर पटेलने फखर झमानला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. फखर आणि साहिबजादा फरहान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी झाली. जेव्हा फखर आपले खातेही उघडू शकला नाही तेव्हा तो बुमराहच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. पण त्याने रिव्ह्यू घेतला ज्यामुळे त्याला जीवनदान मिळाले. पण फखर भारतासाठी अडचणी निर्माण करू शकण्यापूर्वी तो अक्षरच्या चेंडूवर आऊट झाला. फखरने १५ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या. अक्षर पटेलने पुन्हा एकदा भारताला यश मिळवून दिले आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आगा खाते न उघडताच एलबीडब्ल्यू झाला होता. पण त्याने रिव्ह्यू घेतला आणि त्याला जीवनदान मिळाले. पण तो याचा फायदा घेऊ शकला नाही आणि फक्त तीन धावा करू शकला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांनी ४९ धावांवर चौथी विकेट गमावली. या सामन्यातील अक्षरची ही दुसरी विकेट ठरली. पाकिस्तानचा अर्धा संघ फक्त ६४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने हसन नवाजला अक्षरने झेल देऊन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सात चेंडूत पाच धावा काढून हसन बाद झाला. कुलदीप यादवने आपली जोरदार गोलंदाजी सुरू ठेवली आणि पाकिस्तानला सातवा धक्का दिला. कुलदीपने चांगली फलंदाजी करणाऱ्या साहिबजादा फरहानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ४४ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४० धावा काढून फरहान बाद झाला. ८३ धावांच्या धावांवर पाकिस्तानने सात विकेट गमावल्या. वरुण चक्रवर्तीने फहीम अशरफला बाद करून पाकिस्तानला आठवा धक्का दिला. फहीम १४ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ११ धावा काढून बाद झाला. अशाप्रकारे पाकिस्तानने ९७ धावांवर आठवा बळी गमावला. जसप्रीत बुमराहने सुफियान मुकीमला बाद करून पाकिस्तानला नववा धक्का दिला. मुकीमने बुमराहच्या गोलंदाजीवर दोन चौकार मारले होते. पण १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने त्याला बाद केले. सहा चेंडूत १० धावा काढून मुकीम बाद झाला. आणि पाकिस्तानने 20 षटकांमध्ये 9 विेकेट्स गमावून 127 धावा केल्या.भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवले. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देश खेळाच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.
या स्पर्धेत भारताने पहिला सामना यूएईविरुद्ध खेळला होता. त्यात भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. तर दुसरीकडे पाकिस्ताननेही ओमानविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. अशातच दोन्ही संघ आपला मागचा सामना जिंकून हा सामना खेळत आहेत.