मोहित सोमण: भारत कोकिंग कोल (Bharat Coking Coal) आयपीओचे दणक्यात पदार्पण शेअर बाजारात झाले आहे. प्राईज बँड असलेल्या २३ रूपयाच्या तुलनेत ९५.६५% वाढीसह शेअर ४५ रूपयाला सूचीबद्ध (Listed) झाला आहे. त्यामुळे एक तासाच्या आत गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे. १०६८.७८ कोटी रूपयांच्या आयपीओला १४३.८५ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. तज्ञांच्या मते ३६.५० रूपयाला शेअर सूचीबद्ध होणार होता मात्र गुंतवणूकदारांनी दिलेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर शेअर जवळपास ९६% अधिक प्रिमियम दरात सूचीबद्ध झाला आहे. आज १९ जानेवारीला शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध झाला आहे. त्यामुळे चांगला रिटर्न गुंतवणूकदारांना मिळाल्याने ६०० शेअर्सच्या एका गठय्यामागे (Lot) गुंतवणूकदारांनी १३२०० रूपये प्रति शेअरचा परतावा (Returns) मिळवला आहे. हा संपूर्णपणे ऑफर फॉर सेल इशू असून कुठलाही प्रकारचा फ्रेश इशू नव्हता. कोल इंडिया (Coal India) कंपनीची ही उपकंपनी आहे.
कंपनी भारतात कोकिंग कोल, बिगर कोकिंग कोल (कोळसा) यांचे उत्पादन करते. ९ ते १३ जानेवारीला कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ६०० शेअर (१३८०० रुपये प्रति शेअर) रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. आयपीओपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने २७३.१३ कोटींचा निधी प्राप्त केला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनीच्या इक्विटी वाढीसाठी (Growth) करण्यात येणार आहे. कंपनीला १४३.८५ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले असताना पब्लिक इशूसाठी रिटेल गुंतवणूकदारांकडून ४९.३७ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ३१०.८१ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २४०.४९ पटीने सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले होते.







