Monday, January 12, 2026

INDvs PAK : पाकिस्तानचे सलामीवीर झटपट तंबूत

INDvs PAK : पाकिस्तानचे सलामीवीर झटपट तंबूत
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या साखळी सामन्यात पाकिस्तानला सुरुवातीलाच दोन धक्के बसले आहेत. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानचे सलामीवीर झटपट तंबूत परतले आहेत. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम २३ धावा करुन हार्दिक पांड्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन परतला. तर इमाम उल हक १० धावा करुन धावचीत झाला. अक्षर पटेलने चेंडू थेट यष्ट्यांवर फेकून इमामला बाद केले. पाकिस्तानचा पहिला फलंदाज ४१ धावा झाल्या असताना आणि दुसरा फलंदाज ४७ धावा झाल्या असताना बाद झाला. पाकिस्तानने ११ षटकांत दोन बाद ५५ धावा केल्या. सौद शकील आणि मोहम्मद रिझवान (कर्णधार) हे दोघे फलंदाजी करत आहेत.
भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पाकिस्तानने गमावला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा ६० धावांनी विजय झाला होता. यामुळे अ गटात न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान तळाच्या अर्थात चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास सलग दुसरा विजय मिळवत भारत थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यामुळे भारत - पाकिस्तान सामन्यात काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment