Sunday, September 14, 2025

Bhaubheej : भाऊबीज

Bhaubheej : भाऊबीज
  • कथा : रमेश तांबे

रिया तिच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी. शिवाय जवळपास कोणी जवळचे नातेवाईकही राहात नसल्याने रिया कोणालाच ओवाळत नसे. तिच्या दृष्टीने भाऊबीजेला तसे विशेष महत्त्व नव्हतेच.

आईने रियाची फटाक्यांची पिशवी कपाटातून बाहेर काढली. पिशवी फटाक्यांनी पूर्ण भरली होती. ते पाहून आई म्हणाली, “अगं रिया आज दिवाळीचा शेवटचा दिवस आणि अजून एकही फटाका वाजवला नाहीस. कधी वाजवणार एवढे फटाके? बाबांकडून हट्ट करून फटाके घेतलेस. पण पिशवीत फटाके तसेच!”

“हो गं आई, वाजवणार आहे आज. उगाच चिंता करू नकोस” रिया म्हणाली. मग तिने पिशवी पुन्हा कपाटात ठेवून दिली आणि ती अंघोळीला गेली. तासाभरात रिया तयार झाली. नेहमीसारखीच उत्साही. बाबांनी आणलेले नवे कपडे तिने घातले. वेणीफणी केली आणि आईला म्हणाली, “आई आज भाऊबीज आहे ना.” स्वयंपाक घरातूनच आई, “हो” म्हणाली. खरे तर रिया तिच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी. शिवाय जवळपास कोणी जवळचे नातेवाईकही राहात नसल्याने रिया कोणालाच ओवाळत नसे. तिच्या दृष्टीने भाऊबीजेला तसे विशेष महत्त्व नव्हतेच. त्यामुळे आई निवांत होती. सकाळचे दहा वाजले होते. रिया आईला म्हणाली, “छान जेवण कर. आज माझी भाऊबीज आहे. माझा भाऊ आज आपल्या घरी येणार आहे.” आईला आश्चर्य वाटले! कोण हा मुलगा? आणि रियाने त्याला आपला भाऊ का मानलाय? आता आईच्या डोक्यात विचाराचा भुंगा फिरू लागला.

बरोबर एक वाजता रियाच्या घराची बेल वाजली आणि रियाने धावत जाऊन दरवाजा उघडला. समोर एक दहा-बारा वर्षाचा मुलगा उभा होता. त्याचा हात पकडत रिया म्हणाली, “विजय ये ना घरात, असा बाहेर का उभा आहेस! असे म्हणत विजयला तिने घरात घेतले. आईसुद्धा कोण आले हे पाहण्यासाठी लगबगीने स्वयंपाक घरातून बाहेर आली. तिने त्या मुलाला नीट बघितले. एक काळा- सावळा मुलगा. अंगावर पांढरे शर्ट आणि खाकी पॅन्ट! हा शाळेचा गणवेश आहे हे आईने लगेच ओळखले. रियाने, “आई” अशी हाक मारताच आईची तंद्री भंग पावली. रिया म्हणाली, “आई हा माझा भाऊ! आज मी याला ओवाळणार! हा विजय आमच्या शाळेतील शिपाई काकांचा मुलगा. महानगरपालिकेच्या शाळेत शिकतो.” आईला आपल्या लेकीचं भारीच कौतुक वाटलं.

मग रियाने विजयला ओवाळले. त्याच्या कपाळाला गंध लावला, डोक्यावर अक्षता टाकल्या, गोड लाडू भरवला आणि भेट म्हणून फटाक्यांची गच्च भरलेली पिशवी त्याला दिली. मग विजयने स्वतः काढलेले अन् रंगवलेले छोटेखानी एक सुंदर चित्र रियाला भेट दिले. नंतर आईने दोघांनाही जेवायला वाढले. विजय भरपूर जेवला. रियाने आग्रहाने त्याला वाढले. थोडा वेळ गप्पा मारून विजय आपल्या घरी निघाला. निघताना विजय म्हणाला, “रियाताई तुझं प्रेम या गरीब भावावर असंच कायम राहू दे!” त्यावेळी त्याचे डोळे भरून आले होते. आईनेदेखील डोळ्याला पदर लावला. पण रिया मात्र मोठ्या कौतुकाने विजयकडे बघत होती. पहिल्या भाऊबीजेला ओवाळणी म्हणून मिळालेले ते सुंदर चित्र रियाने अनेक वर्ष भिंतीला टांगून ठेवले होते.

पुढे काही वर्षांनी हाच विजय एक मोठा चित्रकार झाला. रियासुद्धा एका नामांकित कंपनीत नोकरी पटकवून तिच्या संसारात रमून गेली आणि अचानक एका दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी विजय आपल्या बायको-मुलांसह रियाच्या घरी धडकला. विजय अनेक वर्षांनी रियाला भेटत होता. त्यामुळे रियाने त्याला ओळखलेच नाही. शेवटी विजयने हातातले चित्र तिला दाखवले. चित्रात शालेय वयातील रिया रंगवली होती. ते चित्र पाहाताच रिया आनंदाने ओरडली, “अरे विजय तू!”

“होय रियाताई मीच तो, तुझा भाऊ विजय!” आता मात्र दोघांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि खऱ्या अर्थाने भाऊबीज साजरी झाली!

Comments
Add Comment