Friday, September 19, 2025

पोलिसांच्या पेट्रोलिंग दुचाकींची दुरवस्था

पोलिसांच्या पेट्रोलिंग दुचाकींची दुरवस्था

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलीसांच्या पेट्रोलिंगसाठी आणलेल्या दुचाकी गेल्या तीन ते चार महिन्यापासून एकाच जागेवर उभ्या आहेत. या दुचाकीतील पार्ट चोरीला जात असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वेळीच निर्णय न घेतल्यास धुळीमध्ये उभ्या असणाऱ्या या दुचाकींना आता चार महिने पावसाचा सामना करावा लागणार आहे. गस्तीसाठी आणलेल्या दुचाकींचे भंगारांत रूपांतर झाल्यावरच प्रशासन हालचाली करणार का?, असा संतप्त सूर आता स्थानिक रहिवाशांकडून आळविला जात आहे.

मुंबईत पोलीस पेट्रोलिंगसाठी आणलेल्या जवळपास ३०० ते ४०० मोटरसायकल मुंबईतील भोईवाडा नायगाव इथल्या मैदानात तीन ते चार महिन्यांपासून धूळ खात उभ्या आहेत. या गाड्याचे वाटप कधी होणार, पेट्रोलिंगसाठी रस्त्यावर कधी वापरल्या जाणार? हे प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.

भोईवाडा नायगाव इथले पोलीस हुतात्मा मैदान जे हॉकी मैदान म्हणून ओळखले जाते. या मैदानावरील या मोटरसायकलवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीसही तैनात केले आहेत, जे या मोटरसायकलवर २४ तास लक्ष ठेवतील. सामान्य जनतेला एक मोटरसायकल घ्यायला एक लाख रुपये मोजावे लागतात. पण या मैदानात लाखो रुपयांच्या मोटरसायकल धूळखात उभ्या आहेत. यातून करदात्यांच्या पैशांचा गैरवापर कशा प्रकारे होत आहे, याचे उत्तम उदाहरण दिसून येत आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार आहे.

त्यातच गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धूळखात असलेल्या या दुचाकी येणाऱ्या पावसात भिजून खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मोटरसायकल खरोखरीच रस्त्यावर पेट्रोलिंगसाठी वापरल्या जाणार आहेत की त्या भंगारजमा होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment