Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरवाघ नदीतून सावटपाडा ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

वाघ नदीतून सावटपाडा ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

पूल बांधून खडतर प्रवास सुकर करण्याची मागणी

जव्हार (वार्ताहर) : मोखाडा तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या जव्हार तालुका हद्दीतील सावटपाडा या गावाला मुख्य शहराला जोडणारा रस्ता नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी, रुग्ण व ज्येष्ठ ग्रामस्थांना वाघ नदी पोहून पार करावी लागते. न्याहाळे बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. गर्भवतींना पावसाळ्यात घराबाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे एखादा कठीण प्रसंग ओढवला तर वैद्यकीय मदत मिळणे अशक्य होते. वाघ नदीवर पूल बांधून मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला. याठिकाणचे सर्वेक्षण करून नाबार्ड किंवा अन्य योजनेतून पुलाची उभारणी करून सावटपाडा ग्रामस्थांचा मार्ग सुकर होणार आहे.

जव्हार तालुक्यातील न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये सावटपाडा व सांबरपाडा या गावांमध्ये असणाऱ्या वाघनदीवर पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही ग्रामस्थांना पुलाची प्रतीक्षा आहे. गावात कुठलाही रस्ता नाही. जवळजवळ ३ ते चार ४ किमी चालत जाऊन मोखाडा तालुक्याशी संपर्क साधला जातो. जव्हारकडे जाताना ग्रामस्थांना अक्षरशः नदीतून पोहून प्रवास करावा लागतो. ही नदी बारमाही वाहती आहे.

पावसाळ्यात कुठलेच वाहन या ठिकाणी जात नाही. ग्रामस्थांना रेशन किंवा कुठलेही साहित्य आणायचे असेल तर नदी पार करावी लागते. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोखाडा तालुक्यातील सावर्डे ग्रामस्थांसाठी नुकताच लोखंडी पूल उभा करून दिला. सावर्डेपेक्षा आमची परिस्थिती काही वेगळी नाही. मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमची व्यथा समजून घ्यावी, अशी मागणी सावटपाडा ग्रामस्थांनी घातली आहे.

राजकीय लोक येतात. आश्वासने देऊन निघून जातात. पूल मंजूर आहे, असेही सांगतात. मात्र अजूनपर्यंत कुठलीच ठोस उपाययोजना केलेली नाही. ग्रामस्थांची होणारी ही ओढाताण मायबाप सरकार थांबवेल का? – काशीराम चिबडे, रहिवासी, सावटपाडा

चालू मे महिन्याच्या ग्रामसभेत वाघ नदीवर पूल बांधून मिळावा, याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे. तो सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जव्हार यांना सादर करण्यात येणार आहे. – संदीप एखंडे, ग्रामसेवक, न्याहाळे बुद्रुक, ग्रामपंचायत

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -