Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘चला हवा येऊ द्या’ला सागर कारंडेचा रामराम

‘चला हवा येऊ द्या’ला सागर कारंडेचा रामराम

  • ऐकलंत का!: दीपक परब

चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून विनोदवीर सागर कारंडेने एक्झिट घेतली असून श्रेया बुगडेने त्याची पोस्टमन काकांची जागा घेतली आहे. कोरोना महामारीच्या अति कठीण काळात रसिक-प्रेक्षकांची मने रिझविण्याचे मोठे काम ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी चोखपणे बजावले गेले.

याच निखळ विनोदी मालिकेमार्फत सागर कारंडे हे नाव घराघरांत पोहोचले. सागरने या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे फारच चांगल्या प्रकारे मनोरंजन केले. पण आता सागरने ‘चला हवा येऊ द्या’ या बहुचर्चित कार्यक्रमाला रामराम ठोकला आहे. या कार्यक्रमातून सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. तर कधी पोस्टमन काका बनून रडवलेही आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागर कारंडेने आपल्या भावनिक शैलीत सादर केले आहेत. त्यामुळे या हास्य मंचावर प्रेक्षकांचे डोळे आलावण्याचे काम सागरने बरेचदा केले आहे.

एकाचवेळी प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम सागर नेमकेपणाने बजावायचा. आता ‘चला हवा येऊ द्या’मधील त्या पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने घेतली आहे. श्रेयाने त्यासाठी खास पोस्टमनचा वेष परिधान केला आहे. पण सागरने प्रेक्षकांच्या मनात ठसविलेल्या या पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने घेतल्याने सागरचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. सागर कारंडे मालिकेत वाचन करीत असलेले पत्र मनाला भिडायचे. पण श्रेयाच्या बाबतीत तसे घडताना दिसत नाही, असे मत व्यक्त होत आहे. सागर कारंडेने ‘चला हवा येऊ द्या’ का सोडलं?, श्रेयाच्या आवाजात सागरसारखा गंभीरपणा नाही, अशा कमेंट्स समाजमाध्यमांवर व्यक्त केल्या जात आहेत. श्रेया बुगडे एक उत्तम अभिनेत्री असली तरी मनाला भिडणारे ते पोस्टमन काकांचे पत्र वाचण्यात ती कुठेतरी कमी पडत आहे. पण यापुढे ‘चला हवा येऊ द्या’मधील सर्वच विनोदवीर आता ‘पत्र वाचन’ करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सागर एक उत्कृष्ट अभिनेता आणि लेखक आहे. ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. त्याची आणि भारत गणेशपुरेची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून त्याने अनेक विनोदी भूमिका सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचे हृदयस्पर्शी पत्रवाचन प्रेक्षकांना खूपच भावले होते. सागरने छोटा पडदा गाजवण्यासोबत रूपेरी पडद्यावरदेखील काम केले आहे. जलसा, फक्त लढ म्हणा, बायोस्कोप, माय हिंदू फ्रेंड आणि एक तारा या सिनेमांत त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -