Friday, May 17, 2024
Homeरविवार विशेषसध्या महाराष्ट्रात सर्वत्र भाषासंवर्धन

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र भाषासंवर्धन

पंधरवडा साजरा केला जात आहे. पाठोपाठ फेब्रुवारी महिन्यात मराठी भाषा दिन येतोच आहे. महाविद्यालयांमधून ग्रंथदिंड्या आयोजित केल्या जात आहेत. ढोल, लेझिम, नऊवारी साड्या, फेटे, केशरी ध्वज असा सगळा धुमधडाका महाविद्यालयांमधून जोर धरतो आहे. कोण किती ग्रंथ वाचतो किंवा ग्रंथदिंड्यांमुळे किती ग्रंथवाचक घडत आहेत, हे राहिले बाजूला पण नुसता जोरदार धुमधडाका केला म्हणजे वाचनसंस्कृती जगली, वाढली असे होत नाही.

अभ्यास, ज्ञानपिपासा, जिज्ञासा या गोष्टी तर आवश्यक आहेतच. पण भाषासंवर्धनाची जबाबदारी पुढील पिढीने स्वीकारणे हेही तितकेच गरजेचे आहे. ही जबाबदारीची जाणीव नव्या पिढीमध्ये निर्माण करणे ही पालकांची व शिक्षकांची जबाबदारी आहे. भाषांच्या मरणाची चिंता कितीतरी दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. भाषेचे मरण ही घटना तेव्हाच घडते जेव्हा स्वत:च्या भाषेचा त्याग करून वा ती सोडून देऊन आपण दुसरी भाषा स्वीकारतो.

ती का स्वीकारली जाते? आपण आपल्या भाषेचा न्यूनगंड बाळगतो म्हणून? आपल्या भाषेतून आपला विकास होणार नाही, असे आपण समजतो म्हणून? आपल्या भाषेच्या सामर्थ्यावर आपला विश्वास नाही म्हणून? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागणार आहेत.

शब्दांची अनुचित मोडतोड, धेडगुजरी व खिचडी पद्धतीची भाषा वापरणे याबद्दल काही खंत आपल्याला वाटते का, हा प्रश्न मनाला विचारणे गरजेचे आहे. कितीतरी वेळा इंग्रजी व हिंदी शब्दांचा वारेमाप वापर करून मराठीच्या उचित वापराला हरताळ फासला जातो. हे भाषा प्रदूषण केव्हा थांबणार? जाहिरातींपासून मोठ्या कार्यक्रमांपर्यंत ठिकठिकाणी मराठी मजकुराचा चुकीचा अनुवाद केला जातो. भाषेच्या बाबतीत आपण इतके बेपर्वा झालो आहोत, कारण भाषेमुळे आपले काही अडत नाही, असे आपल्याला वाटते. आपली भाषा वापरली नाही, तर आपले काही नुकसान होत नाही, असे आपल्याला वाटते. भाषेचा हात सुटला, तर आपण काय गमावू शकतो, याची जाणीव आपण जर पुढल्या पिढीला योग्य वेळी करून दिली नाही, तर पुढे त्यांना दोष देणेही प्रस्तुत ठरणार नाही.

मुलांना इंग्रजीत शिकवायचे, मराठीपासून तोडायचे आणि मग म्हणायचे, नव्या पिढीची गोची झाली आहे, हे काही खरे नाही. जगाच्या बाजारात निर्यात करण्यासाठी आपल्या मुलांना तयार करणे हे पालकांचे काम नाही, तर आपल्या संस्कृतीशी, मातीशी त्यांना जोडून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. सामाजिक बदल समजून घेणे, स्वराज्य आणि स्वभाषेची ओळख करून घेणे, तिला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अभ्यास करणे, दु:खितांची वेदना जाणून ती दूर करण्याचे मार्ग शोधणे या सर्वांकरिता नव्या पिढीला घडवणे ही काळाची गरज आहे. अन्यथा ‘भाषेचे मरण पाहिले म्या डोळा’ असे म्हणायची वेळ फारशी दूर नाही.

-डॉ. वीणा सानेकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -