राज्यातील शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पारदर्शक, गतिमान आणि मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रशासकीय प्रक्रिया पुनर्रचना (जीपीआर) उपक्रमाला अधिक गती द्यावी. सरकारी कार्यालयात खेटे घालणं, फाईल अडकणं, पुन्हा पुन्हा कागदपत्रं मागणं, हे चित्र आता बदलायचं आहे. येत्या 26 जानेवारीपर्यंत लोकांना डिजिटल पद्धतीने सरकारी सेवा मिळण्याचा वेगळा अनुभव द्यायचा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 174 नव्या डिजिटल सेवांचं लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या दीड-दोन वर्षांपासून सरकार हेच करतंय की योजना लोकांपर्यंत सहज पोहोचाव्यात. पारदर्शकता, वेग आणि जबाबदारी, या तीन गोष्टींवर आमचा भर आहे. आमचं ध्येय आहे ‘झिरो ब्युरोक्रसी’ म्हणजे कामात अडथळे नकोत, माणसावर अवलंबून राहण्याची गरज नको. राज्यात एकूण 1129 सरकारी प्रक्रिया सोप्या करण्याचं ठरलं होतं. त्यातल्या 397 प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, म्हणजे जवळपास 35 टक्के काम झालंय. आज सुरू झालेल्या 174 सेवांमध्ये मैत्री 2.0 वरच्या 76, आपले सरकार 2.0 वरच्या 74 आणि महाडीबीटी 2.0 वरच्या 24 सेवांचा समावेश आहे. या डिजिटल बदलामुळे आता विनाकारण प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार नाही. वारंवार तीच कागदपत्रं मागितली जाणार नाहीत. पेपरलेस कारभाराकडे वाटचाल होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावं, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
https://www.prahaar.in/2026/11/26/complete-the-work-on-the-bharat-ratna-dr-babasaheb-ambedkar-memorial-at-indu-mill-by-2027-directs-chief-minister-devendra-fadnavis/
आज आरटीएस 2.0, महाडीबीटी 2.0, मैत्री 2.0, महाउपलब्धी यासारख्या अनेक प्रणाली सुरू झाल्या. महाउपलब्धीमुळे आता पेन्शनधारकांना मोबाईलवरूनच डिजिटल जीवन प्रमाणपत्र बनवता येणार आहे. त्यासाठी ऑफिसात जाऊन हयात असल्याचं दाखवावं लागणार नाही. याच कार्यक्रमात पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामीण तरुणांसाठी एक नवी योजना जाहीर केली. अंडी, दूध, पोल्ट्री, मांस, शेळीपालन, वराहपालन यातून गावातल्या तरुणांना उद्योजक बनवायचं आहे. ही योजना पूर्ण ऑनलाइन असेल. सर्वसाधारण लोकांना 50 टक्के, तर महिला आणि SC-ST प्रवर्गाला 75 टक्के अनुदान मिळणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत अजून काही महत्त्वाच्या सेवा सुरू होणार आहेत आणि 31 डिसेंबरपर्यंत सगळं तांत्रिक काम पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.