संविधान दिनानिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. संविधानाचा सन्मान आणि त्याच्या अंमलबजावणीवरून सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर भाष्य करताना शाह यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले. जे लोक हातात संविधान घेऊन फिरत आहेत, त्यांनी संसद ग्रंथालयात जाऊन किमान 15 मिनिटे ते वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी बोलताना अमित शाह यांनी संविधानाचा आत्मा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यानंतर संविधानाला केवळ सरकार चालवण्याचे एक पुस्तक मानण्याचा प्रयत्न झाल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. किशोरवयीन, तरुण आणि नागरिकांमध्ये संविधानाचा आत्मा रुजवण्याची प्रक्रिया मागे पडल्याचे सांगत, 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 2015 पासून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून संविधानाची सर्वोच्च मूल्ये शाळा, महाविद्यालये आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचतील, असे त्यांनी नमूद केले.
https://www.prahaar.in/2026/11/26/complete-the-work-on-the-bharat-ratna-dr-babasaheb-ambedkar-memorial-at-indu-mill-by-2027-directs-chief-minister-devendra-fadnavis/
संविधान नागरिकांना कसे सक्षम करते, यावरही अमित शाह यांनी सविस्तर भाष्य केले. संविधानामुळे नागरिकांना त्यांच्यावर कसे राज्य केले जावे हे ठरवण्याचा अधिकार मिळतो, तसेच सत्ताधाऱ्यांना संविधानाच्या मर्यादेत राहून कारभार करण्याचे निर्देश मिळतात, असे ते म्हणाले. गेल्या 80 वर्षांत देशातील जनतेने हे सिद्ध केले आहे की, 1949 मध्ये संविधानाने लोकशाहीची चौकट दिली असली तरी भारताच्या संस्कृतीने हजारो वर्षांपासून लोकशाही मूल्यांचे जतन केले आहे, जे संविधानाच्या कलमांमधून दिसून येते.
संविधानाचा आदर हा केवळ दिखाव्यापुरता मर्यादित नसावा, असा स्पष्ट संदेशही अमित शाह यांनी दिला. संविधानाचा सन्मान करण्याचे दोन मार्ग सांगताना ते म्हणाले की, एक मार्ग म्हणजे पवित्र ग्रंथाप्रमाणे त्याचा मान राखणे किंवा कोणीतरी तो खिशात ठेवून लोकांसमोर फडकवू शकतो. मात्र, दुसरा आणि खरा मार्ग म्हणजे एक व्यक्ती म्हणून आणि एक राजकीय पक्ष म्हणून संविधानाने घालून दिलेल्या मानकांनुसार आणि नियमांनुसार आचरण करणे होय. गेल्या 80 वर्षांत संविधान, घटनात्मक संस्था, शासनप्रणाली आणि लोकशाहीवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.