Home ब्रेकिंग न्यूज Raigad News : फ्लॅट नव्हे, गावाच्या पद्धतीनुसार घरे बांधणार; दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राधान्य

Raigad News : फ्लॅट नव्हे, गावाच्या पद्धतीनुसार घरे बांधणार; दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राधान्य

0
Raigad News : फ्लॅट नव्हे, गावाच्या पद्धतीनुसार घरे बांधणार; दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राधान्य

रायगड: दरड दुर्घटनांमध्ये घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना आता फ्लॅट पद्धतीने नव्हे, तर त्यांच्या गावाच्या रचनेनुसार आणि जीवनशैलीला अनुरूप घरे बांधून देण्यात येणार आहेत. पुनर्वसनाचे काम सुरू झाल्यानंतर ते रखडू नये, यासाठी ‘स्टार्ट टू फिनिश’ पद्धतीने दर्जेदार घरे उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पुनर्वसनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

महाड-पोलादपूरमधील दरडग्रस्तांना हक्काचा निवारा

महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात गुरुवारी दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिंदे यांनी बाधित कुटुंबांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा मिळवून देण्यासाठी पुनर्वसन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.

https://www.prahaar.in/2026/11/26/complete-the-work-on-the-bharat-ratna-dr-babasaheb-ambedkar-memorial-at-indu-mill-by-2027-directs-chief-minister-devendra-fadnavis/

‘फ्लॅट सिस्टमप्रमाणे घरे नकोत, तर गावकऱ्यांच्या राहणीमानाला अनुरूप घरे बांधा’, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. घरांच्या बांधकामासाठी योग्य कंत्राटदाराची निवड, कामाचा दर्जा आणि वेळेत पूर्तता याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पारमाची आणि इर्शाळवाडीच्या पुनर्वसनावर भर

आदर्श गाव पारमाची परिसरातील बाधितांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचौना त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आवश्यक यंत्रणा सक्रिय करून पुनर्वसनाचे काम वेगाने पूर्ण करण्यासही सांगितले.

इर्शाळवाडी दुर्घटनेतील पुनर्वसनाचा आढावा घेताना प्रलंबित घरांचे प्रश्नही प्राधान्याने सोडवण्याची भूमिका शिंदे यांनी मांडली. महाड, पोलादपूर आणि अन्य आपत्तीग्रस्त भागांतील नागरिकांना त्यांच्या गावाच्या स्वरूपानुसार सुरक्षित आणि दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

‘केवळ आश्वासन नाही, प्रत्यक्ष कामातून दिलासा’

घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. दरड दुर्घटनांमध्ये अनेक कुटुंबांचे घर हिरावले गेले आहे. अशा नागरिकांना पुन्हा सुरक्षित निवारा मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. रोटी, कपडा आणि मकान देण्याच्या जबाबदारीतून सरकार मागे हटणार नाही. केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कामातून बाधितांना दिलासा दिला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हाधिकारी किसन जावळे, युवासेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांच्यासह म्हाडा आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दरडग्रस्त गावांतील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here