मुंबईची मैदाने आणि उद्यानं ही मुंबईकरांच्या हक्काची आहेत. ती कोणत्याही खासगी संस्थेच्या ताब्यात जाणार नाहीत, असा ठाम निर्णय आज मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. 2023 साली तयार केलेला मैदाने खासगी संस्थांना देण्याचा धोरणाचा मसुदा मागे घ्या आणि सर्व मैदानं महापालिकेनेच विकसित करून सांभाळा, असं त्यांनी सांगितलं. मंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला महापौर रितू तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबईत सध्या 1123 खेळाची मैदानं आणि 343 उद्यानं आहेत. यातली बहुतेक मैदानं आणि उद्यानं महापालिकाच सांभाळते. फक्त 15 मैदानं आणि 7 उद्यानं सध्या खासगी संस्थांकडे देखभालीसाठी आहेत. जुन्या धोरणानुसार दिलेल्या 11 मैदानांच्या काळजीवाहू कराराची आणि 18 मैदानांच्या दत्तक कराराची मुदतही संपली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. या बैठकीत महापौर आणि आमदार अमित साटम यांनी खासगीकरणाला ठाम विरोध केला. मैदानं ही मुंबईकरांची मालमत्ता आहे. महापालिकेनेच तिथे चांगल्या सुविधा आणि सुरक्षा द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. हा विषय अनेक वर्षांपासून रखडला आहे, त्यावर पुढच्या 60 दिवसांत निर्णय घ्या, अशी मागणी साटम यांनी केली. त्याला मंगलप्रभात लोढा यांनीही पाठिंबा दिला.
https://www.prahaar.in/2026/11/25/gautam-adani-attends-mumbai-book-festival-urges-students-to-learn-from-books-and-contribute-to-nation-building/
त्यावर आयुक्तांनी देखभाल आणि सुरक्षेसाठी निधी आणि मनुष्यबळ अपुरं असल्याचं सांगितलं. मात्र सीएसआर निधीतून हा खर्च भागवता येईल, असं त्यांनी सुचवलं. यासाठी एक स्वतंत्र समिती बनवण्याची सूचना लोढा यांनी केली. शेवटी पालकमंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. मैदानं विकसित करताना वेगवेगळ्या खेळांचा विचार करा. चालण्यासाठी, जॉगिंगसाठी सुविधा द्या. पहिल्या टप्प्यात काही निवडक मैदानं आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवा आणि ते मॉडेल मुंबईकरांसमोर ठेवा. सीएसआर निधीसाठी महापालिकेने सार्वजनिक आवाहन करावं, असंही त्यांनी सांगितलं. एकूणच, मुंबईची मोकळी जागा मुंबईकरांचीच राहणार, असे या बैठकीत सांगण्यात आले.