मुंबई : जपानमधील ओकायामा प्रांताचे राज्यपाल रयुता इबारागी आणि ओकायामा प्रांतीय विधानसभेचे अध्यक्ष मसाताका ओटा यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. 23 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात ही सदिच्छा भेट झाली. यावेळी महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासह व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीबाबत चर्चा करण्यात आली.
https://www.prahaar.in/2026/11/25/creative-minds-of-tomorrow-concludes-at-iffi-2026-one-last-stop-named-the-best-film/
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करत या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र आणि जपानमधील संसदीय आदान-प्रदान, आर्थिक सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि नागरिकांमधील संपर्क वाढवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा
या शिष्टमंडळात ओकायामा प्रांतातील वरिष्ठ सरकारी अधिकारी, प्रांतीय विधानसभेचे सदस्य, ओकायामा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे पदाधिकारी तसेच विविध उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश होता. मुंबईतील जपानच्या महावाणिज्यदूत हितोमी सातो आणि उप-वाणिज्यदूत यो निशिओ यांच्यासह इंडो-जपान बिझनेस कौन्सिल आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपानचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्र आणि ओकायामा प्रांत यांच्यातील संस्थात्मक संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला. व्यापार, गुंतवणूक, औद्योगिक विकास, तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्याबाबत विचारविनिमय झाला.
जपानी उद्योगांसाठी महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधी
भारताच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकासात जपान महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. जपानचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि औद्योगिक कौशल्य भारतातील विविध विकास प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरले आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख औद्योगिक आणि आर्थिक केंद्र असल्याने वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रांत जपानी उद्योगांसाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत.
2027 मध्ये भारत-जपान मैत्रीची 75 वर्षे
भारत आणि जपान यांच्यात 28 एप्रिल 1952 रोजी राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. 2027 मध्ये या संबंधांना 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि ओकायामा प्रांतातील सहकार्य वाढवण्यासाठी झालेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य आणि प्रांतीय स्तरावरील संवाद वाढवण्यावरही यावेळी भर देण्यात आला.