Home ब्रेकिंग न्यूज NCMC Smart Card : एनसीएमसी स्मार्ट कार्ड निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा; प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

NCMC Smart Card : एनसीएमसी स्मार्ट कार्ड निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा; प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

0
NCMC Smart Card : एनसीएमसी स्मार्ट कार्ड निविदा प्रक्रियेची संपूर्ण माहिती सादर करा; प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा सुरुवातीपासूनचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत. निविदा प्रक्रियेतील प्रशासकीय आणि तांत्रिक निर्णयांसह संबंधित सर्व कागदपत्रे तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

निविदा प्रक्रियेबाबत उपस्थित झाले प्रश्न

NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाची अंमलबजावणी, निविदा प्रक्रिया आणि कंत्राटदार कंपनीची निवड याबाबत प्रसारमाध्यमांमधून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर निविदा कोणत्या पद्धतीने राबवण्यात आली, त्यासाठी कोणते प्रशासकीय आणि तांत्रिक निकष निश्चित केले होते, तसेच संबंधित कंपनीची निवड कोणत्या आधारावर झाली, याची माहिती स्पष्ट करण्याची भूमिका सरनाईक यांनी घेतली आहे.

निविदेतील सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

मंत्री सरनाईक यांनी निविदा प्रक्रियेशी संबंधित अनेक कागदपत्रे मागवली आहेत. यामध्ये निविदा काढण्यासंबंधीचे निर्णय, प्रशासकीय मंजुरी, निविदेतील अटी व शर्ती, तांत्रिक आणि आर्थिक पात्रतेचे निकष, सहभागी कंपन्यांचे देकार आणि त्यांची तुलनात्मक माहिती यांचा समावेश आहे.

याशिवाय तांत्रिक छाननी व आर्थिक मूल्यमापनाचे अहवाल, निविदा मूल्यांकन समितीचे इतिवृत्त आणि कंत्राटदार कंपनीच्या निवडीसाठी वापरण्यात आलेले निकषही सादर करण्यास सांगितले आहे.

स्मार्ट कार्डची किंमत आणि आर्थिक व्यवहारांचीही माहिती मागवली

निविदा मंजुरी, कार्यादेश, करारनामा आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीशी संबंधित कागदपत्रांसोबतच स्मार्ट कार्डची किंमत कशी निश्चित करण्यात आली, महामंडळ आणि संबंधित कंपनीमधील आर्थिक व्यवहारांचे स्वरूप काय आहे, तसेच महसूलविषयक अटी काय आहेत, याचीही माहिती मागवण्यात आली आहे. प्रकल्पासंदर्भातील पत्रव्यवहार आणि संचालक मंडळाचे ठराव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पारदर्शकतेसाठी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश

मागवलेली सर्व माहिती कोणतीही दिरंगाई न करता संकलित करावी आणि संबंधित कागदपत्रांसह स्पष्ट अभिप्राय देऊन अहवाल सादर करावा, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.

या अहवालामुळे NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेपासून अंमलबजावणीपर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती प्रशासकीय स्तरावर तपासली जाणार आहे. मात्र, सध्या हा अहवाल मागवण्यात आला असून, निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here