Nikhil Damle: सरत्या वर्षातील अनुभव, शिकवण आणि आठवणी सोबत घेऊन नव्या वर्षात काही नवीन गोष्टी करण्याचा संकल्प केला जातो. झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेत ‘ऋषी ’ची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल दामले याच्यासाठीही 2026 हे वर्ष एका चांगल्या सवयीची सुरुवात करणारे ठरले. वर्षभरातील चांगलया सवयी आणि 2027 मधील संकल्पना याविषयी निखिलने भाष्य केले आहे. 2026 मध्ये वाचनाची त्याला गोडी वाढली, मराठा इतिहासाचा सखोल अभ्यास केला, असे खास वर्षभरातील अनुभव ऋषीने सांगितले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/25/pooja-biraris-new-serial-i-dont-tolerate-wrongdoings-what-did-pooja-birari-say-about-shivani-from-yetech-aata-mi-nandalaya/
अभिनेता निखिल दामले काय म्हणाला?
आपल्या 2026 च्या चांगल्या सवयी आणि 2027 च्या संकल्पांबद्दल सांगताना निखिल दामले म्हणाला की, या वर्षात माझ्यात झालेला एक चांगला बदल म्हणजे मी आधीपेक्षा जास्त वाचन करू लागलो आहे. ही सवय मला आवडली असून, नवीन वर्षातही ती कायम ठेवायची आहे. या वर्षात मी ‘छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे’, ‘तुम्हारी औकात क्या है’ (पियूष मिश्रा), ‘द करेज टू बी डिसलाइक्ड’, ‘द हिडन हिंदू’ यांसारखी पुस्तके वाचली. तसेच ‘सभासद बखर’ आणि ‘शिवभारत काव्य’ यांचाही अभ्यास केला, असे निखिल म्हणाला.
पुढे बोलताना, मराठा इतिहासातील मूळ कागदपत्रे आणि अस्सल ऐतिहासिक संदर्भ वाचण्याची मला विशेष आवड निर्माण झाली आहे. यातून नेमके काय घडले होते आणि कोणत्या गोष्टी केवळ दंतकथा आहेत, हे समजून घेता येते. तसेच आपल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मी माझे नवीन वर्ष कुटुंबीय किंवा मित्रांसोबत साजरे करणार आहे. सध्या तरी काही खास प्लॅन केलेला नाही. आगामी वर्षात मला अभिनयाच्या बाबतीत आणखी चांगले आणि आव्हानात्मक काम करायला आवडेल. प्रेक्षकांनी माझ्या कामावर यापुढेही असेच प्रेम करावे, ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर माझ्या आरोग्याकडे आणि व्यायामाकडे अधिक लक्ष देऊन फिटनेसच्या बाबतीत नियमित राहण्याचा माझा संकल्प आहे, असे निखिलने सांगितले. 2026 मध्ये वाचनातून नवी आवड जोपासणाऱ्या निखिलसाठी 2027 हे वर्ष स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे घडवण्याचे असो. ही सदिच्छा!