Home ब्रेकिंग न्यूज Uday Samant : ‘गाव तिथे उद्योजक’ योजना धाराशिवमधून सुरू होणार; नवउद्योजकांना 1 कोटीपर्यंत अर्थसहाय्य

Uday Samant : ‘गाव तिथे उद्योजक’ योजना धाराशिवमधून सुरू होणार; नवउद्योजकांना 1 कोटीपर्यंत अर्थसहाय्य

0
Uday Samant : ‘गाव तिथे उद्योजक’ योजना धाराशिवमधून सुरू होणार; नवउद्योजकांना 1 कोटीपर्यंत अर्थसहाय्य

धाराशिव : राज्यातील ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून ‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातून करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत अर्थसहाय्य आणि 35 टक्के अनुदान देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून धाराशिव येथे आयोजित नोकरी महोत्सवाचे उद्घाटन डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार ओमराजे निंबाळकर, डॉ. जयराजे निंबाळकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने तरुण-तरुणी उपस्थित होते.

https://www.prahaar.in/2026/11/24/uttarakhand-government-10000-rupees-direct-bank-transfer-for-women-bjp-masterstroke-ahead-of-elections/

प्रत्येक गावात उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट

‘गाव तिथे उद्योजक’ उपक्रमांतर्गत उद्योग विभागाचे पथक धाराशिव जिल्ह्यातील गावागावांत सर्वेक्षण करणार आहे. प्रत्येक गावात किमान एक उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून नवउद्योजकांना 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक मदत आणि 35 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

संरक्षण उद्योग आणि लॉजिस्टिक पार्क उभारण्याबाबत चर्चा

धाराशिव जिल्ह्यात संरक्षण क्षेत्रातील उद्योग आणि लॉजिस्टिक पार्क उभारण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात विशेष बैठक आयोजित केली जाणार असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्यासह एमआयडीसीच्या विकासाची जबाबदारी उद्योग विभाग घेईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बना!

तरुणांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता स्वतः उद्योजक बनून इतरांनाही रोजगार द्यावा, असे आवाहन डॉ. सामंत यांनी केले. महाराष्ट्रातील उद्योजक गणेश निबे यांच्या यशाचा दाखला देत त्यांनी छोट्या व्यवसायातूनही मोठा उद्योग उभारता येतो, असे सांगितले. सुरुवातीला नोकरी करून अनुभव मिळवावा आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करावा, असेही त्यांनी नमूद केले.

रत्नागिरीतही 24 तास जनसंपर्क कार्यालय

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या 24 तास सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या संकल्पनेचे डॉ. सामंत यांनी कौतुक केले. याच धर्तीवर रत्नागिरी मतदारसंघातही जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच येडशी येथील जळीतग्रस्त कुटुंबाला मदत करण्यासह संबंधित तरुणाला पुन्हा उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

धाराशिवमध्ये येणाऱ्या नवीन उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here