इस्लामाबाद : बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) बलुचिस्तानमध्ये केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये 20 पाकिस्तानी सैनिक आणि कथित सहकाऱ्यांना ठार केल्याचा दावा करत मोठी खळबळ उडवून दिली आहे. सोमवारी जारी केलेल्या निवेदनात BLA चा प्रवक्ता जियान्द बलुच याने सांगितले की, 21 नोव्हेंबर रोजी नुश्की येथील हझदा खोल भागात पाकिस्तानी लष्कराच्या 93 विंग छावणीवर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या संघटनेचे हवाई पथक काहर आणि फतेह पथक सहभागी होते. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, काहर पथकाने हल्ल्याची सुरुवात केली, तर इतर लढाऊ पथकांनी अवजड आणि अन्य शस्त्रांचा वापर करून अनेक दिशांनी पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला. BLA च्या दाव्यानुसार, हवाई पथकाने लष्करी तळांवर ड्रोनच्या साहाय्याने 11 हल्ले केले, ज्यात छावणीतील 8 जवान ठार आणि 7 जण जखमी झाले. रेको आणि हारुनी येथील छावण्यांना मदत पाठवणाऱ्या ताफ्यांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. रेको येथे 3 जवान ठार आणि किमान 4 जण जखमी झाले, तर हारुनी येथे नेमबाजांनी 2 जवानांना ठार केले. जरीन जंगलातील पूल स्फोटात उडवून दिल्याने कुमक रोखली गेली आणि नुश्की कारवाईत एकूण 13 सैनिक ठार व 11 हून अधिक जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
त्याच दिवशी मस्तुंगमधील गुरगिना भागात पुढे सरकणाऱ्या सैनिकांवर IED हल्ला करून 3 ठिकाणी सशस्त्र हल्ले करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला असून त्यात 5 जवान ठार व अनेक जखमी झाले तसेच वाहनांचे नुकसान झाले. 22 नोव्हेंबर रोजी चगाईतील तालो बर्तगजी परिसरात क्वेटा-ताफतान व्यापारी मार्ग रोखून 2 व्यावसायिक वाहने ताब्यात घेतल्याचे आणि लष्करी ताफ्यावर हल्ला केल्याचे निवेदनात म्हटले आहे, मात्र यातील जीवितहानीचा आकडा स्पष्ट केलेला नाही. बुलेदा येथील जंतरी भागात 1 सैनिकाला आणि किल्ला अब्दुल्ला येथील गजाबंदजवळ डेथ स्क्वॉड सदस्याचा दावा केलेल्या 1 व्यक्तीला ठार केल्याचेही सांगण्यात आले. पाकिस्तानी लष्कर माघार घेईपर्यंत जमिनीवरील व हवाई कारवाया सुरू राहतील, असा इशारा BLA ने दिला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/24/vietnam-gas-leak-blast-massive-explosion-at-hotpot-restaurant-kills-6-many-still-trapped-under-debris/
दरम्यान, रविवारी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने (BLF) 2 ते 21 नोव्हेंबरदरम्यान 21 मोहिमांत 36 जवान आणि सरकारसमर्थक सशस्त्र गटाच्या 1 कथित सदस्याला ठार केल्याचा दावा केला होता. BLF प्रवक्ता मेजर ग्वाहराम बलुच यांच्या म्हणण्यानुसार, 17 नोव्हेंबर रोजी खुजदार येथील क्वेटा-कराची महामार्गावरील अंजिरा, जीवा आणि लखोरियन येथे 3 हल्ल्यांत 20 सुरक्षारक्षक ठार झाले आणि NADRA कार्यालयाला आग लावण्यात आली. तसेच 10 नोव्हेंबर रोजी हाजी शहराजवळ 8, 16 नोव्हेंबर रोजी नुश्कीत 4 व खारानमध्ये 3 आणि 12 नोव्हेंबर रोजी मस्तुंगमध्ये 1 जवान ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.