Home ब्रेकिंग न्यूज Chandrashekhar Bawankule : पडीक जमीन ताब्यात घेण्याचा नियम जमीन मालक शेतकऱ्यांना लागू नाही !

Chandrashekhar Bawankule : पडीक जमीन ताब्यात घेण्याचा नियम जमीन मालक शेतकऱ्यांना लागू नाही !

0
Chandrashekhar Bawankule : पडीक जमीन ताब्यात घेण्याचा नियम जमीन मालक शेतकऱ्यांना लागू नाही !

मुंबई : तीन वर्षे जमीन पडीक ठेवल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली येऊ शकते, या विधानावरून निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिले. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगत, हा नियम सर्वसाधारण शेतकऱ्यांना किंवा स्वतःच्या जमिनीवर शेती करणाऱ्या मूळ मालकांना लागू होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करून लँडबँक तयार करणाऱ्या आणि त्या पडीत ठेवणाऱ्यांनाच शेती करण्याचे आवाहन आपण केले होते, असे बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यात १९४८ चा कुळ कायदा अस्तित्वात असून, त्यातील कलम ६५ नुसार तीन वर्षे जमीन पडीत ठेवल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली येण्याची तरतूद आहे. या कायद्याचा संदर्भ देताना आपण मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करून त्यांचा वापर न करणाऱ्यांविषयी भूमिका मांडली होती, असे बावनकुळे म्हणाले. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा किंवा विदर्भातील सर्वसाधारण शेतकरी स्वतःच्या जमिनीवर शेती करत असेल, तर त्याच्या जमिनीवर या तरतुदीचा परिणाम होणार नाही. मूळ शेतकऱ्यांसाठी कोणतीही अट घालण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

https://www.prahaar.in/2026/11/23/assembly-speaker-narwekar-rejects-allegations-of-land-grabbing-from-tribals/

काही लोकांनी ५०, १०० किंवा २०० एकर जमिनी शेतकऱ्यांकडून खरेदी करून लँडबँक तयार केल्या आहेत. या जमिनींवर फार्महाऊस बांधून किंवा अन्य कारणांनी त्या पडीत ठेवल्या जात असतील, तर चांगला पाऊस झाल्यानंतर त्या शेतीच्या उपयोगात आणाव्यात, असे आपले आवाहन असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. जमिनींचा शेतीसाठी वापर झाल्यास राज्याचे आणि देशाचे कृषी उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्यातून राष्ट्रीय उत्पन्न आणि सकल देशांतर्गत उत्पादनातही (जीडीपी) वाढ होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here