Home देश भारताची मोठी झेप ! स्वदेशी ‘JWALA MK-1’ अँटी-ड्रोन मिसाईल सिस्टमची यशस्वी चाचणी

भारताची मोठी झेप ! स्वदेशी ‘JWALA MK-1’ अँटी-ड्रोन मिसाईल सिस्टमची यशस्वी चाचणी

0
भारताची मोठी झेप ! स्वदेशी ‘JWALA MK-1’ अँटी-ड्रोन मिसाईल सिस्टमची यशस्वी चाचणी

भारताने संरक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या भारताच्या स्वदेशी अँटी-ड्रोन तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी पार पडली आहे. संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी कंपनी IG Defence ने राजस्थानमधील पोखरण येथे ‘JWALA MK-1’ या ऑटोनॉमस काउंटर-ड्रोन मायक्रो-मिसाईल सिस्टमची यशस्वी चाचणी केली. कंपनीच्या दाव्यानुसार, ही भारतातील पहिली स्वायत्त काउंटर-UAS मायक्रो-मिसाईल प्रणाली आहे. विशेष म्हणजे, ही प्रणाली ५ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शत्रूच्या ड्रोनचा शोध घेऊन त्यांना हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे.

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने ड्रोनची ओळख आणि लक्ष्य निश्चिती

‘JWALA MK-1’ ही प्रणाली विशेषतः शत्रूच्या ड्रोनचा शोध घेणे, त्यांचा मागोवा घेणे आणि त्यांना हवेतच नष्ट करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये AI आधारित GRID तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान विविध सेन्सर्सकडून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून ड्रोनची ओळख आणि वर्गीकरण करते. तसेच मोहिमेशी संबंधित निर्णय घेण्यासही मदत करते.

आधुनिक युद्धात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः एकाच वेळी अनेक ड्रोनच्या माध्यमातून होणारे हल्ले म्हणजेच ‘ड्रोन स्वार्म’ हे मोठे आव्हान बनले आहे. अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी JWALA MK-1 ही कमी खर्चातील प्रभावी हार्ड-किल प्रणाली म्हणून विकसित करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/23/india-and-nepal-sign-8-memorandums-of-understanding-mous-cooperation-to-span-sectors-from-space-and-health-to-good-governance/

२ ते ५ किलोमीटरपर्यंत ड्रोन नष्ट करण्याची क्षमता

या प्रणालीची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे तिची मारक क्षमता. कंपनीच्या माहितीनुसार, JWALA MK-1 ही प्रणाली २ ते ५ किलोमीटर अंतरावरील आणि ५० मीटर ते ५ हजार मीटर उंचीवर उडणाऱ्या शत्रूच्या ड्रोनचा मागोवा घेऊन त्यांना नष्ट करू शकते. विशेष म्हणजे, लक्ष्याची ओळख पटल्यापासून मिसाईल लॉन्च होण्यासाठी ७ सेकंदांपेक्षाही कमी वेळ लागतो.

मिसाईलमध्ये कोणते तंत्रज्ञान वापरले ?

या प्रणालीमध्ये अचूकता आणि नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी ड्युअल-पल्स सॉलिड रॉकेट मोटर आणि फिन कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय प्रॉक्सिमिटी फ्यूजसह हाय-एक्सप्लोसिव्ह वॉरहेड देण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रणाली ट्रकवर बसवण्यात येणाऱ्या मल्टी-कॅनिस्टर लॉन्चरच्या माध्यमातून कार्यान्वित करता येते. यातील GRID ही AI आधारित मिशन ऑटोनॉमी आणि बॅटल मॅनेजमेंट प्रणाली विविध सेन्सर्सकडून मिळणारा डेटा एकत्रित करते. त्यानंतर संभाव्य लक्ष्याची ओळख, वर्गीकरण आणि एंगेजमेंट मॅनेजमेंटची प्रक्रिया एकाच यंत्रणेद्वारे समन्वयित केली जाते.

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला बळ

सध्या आधुनिक युद्धात कमी किमतीच्या ड्रोनचा वापर करून मोठे नुकसान घडवण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक ड्रोनला रोखण्यासाठी महागड्या एअर डिफेन्स मिसाईलचा वापर करणे खर्चिक ठरू शकते. त्यामुळे JWALA MK-1 सारखी स्वदेशी अँटी-ड्रोन प्रणाली भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

या तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची भारताची क्षमता अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकते. तसेच देशांतर्गत संरक्षण उत्पादन आणि आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेलाही यामुळे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here