अहिल्यानगर (प्रतिनिधी) : पावसाने पाठ फिरवली, जलसाठे आटू लागले आणि आता जमिनीच्या पोटातील पाण्यानेही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात भूजल पातळीत झालेली तब्बल 2.80 मीटरची सरासरी घसरण ही केवळ आकडेवारी नसून आगामी भीषण पाणीटंचाईची धोक्याची घंटा आहे. पावसाळ्यात अपेक्षित पावसाच्या केवळ 66 टक्के पाऊस झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झाले नाही. त्यातच पिण्याचे पाणी, शेती आणि अन्य कारणांसाठी सुरू असलेला अमर्याद भूजल उपसा परिस्थिती अधिक गंभीर करीत आहे. अहिल्यानगर तालुक्यात तब्बल 4.87मीटरने भूजल पातळी खोल गेली असून जामखेडमध्ये 4.78 मीटरची घसरण नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासमोर आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
भूजल सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षणातून जिल्ह्यातील पाणीस्थितीचे भयावह वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील 202 निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून दरमहा भूजल पातळीची नोंद घेतली जाते. या नोंदींच्या आधारे भूजलसाठ्याचा अंदाज बांधला जातो. सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजल पातळीत 2.80 मीटरची घट नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये भूजल पातळी 5.75 मीटरपर्यंत खोल गेल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. म्हणजे पावसाळा संपल्यानंतरही जमिनीतील पाण्याची स्थिती सुधारण्याऐवजी अधिक खालावत चालली आहे.
यंदा जिल्ह्यात अवघा 297.90 मिलिमीटर पाऊस झाला. अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 66 टक्के असून तब्बल 34 टक्के पावसाची तूट आहे. पाऊस कमी झाल्याने विहिरी, कूपनलिका आणि जमिनीतील जलसाठ्यांचे पुनर्भरण अपेक्षेप्रमाणे झाले नाही. मात्र पाण्याची मागणी कमी झालेली नाही. पिण्यासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी आणि अन्य वापरासाठी भूगर्भातील पाण्याचा उपसा सुरूच आहे. परिणामी, जमिनीच्या पोटातील पाणी वेगाने संपत असून, पुढील उन्हाळ्यात टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
https://www.prahaar.in/2026/11/23/demand-for-action-against-param-bir-singh-in-the-mansukh-hiren-murder-case-hearing-in-nia-court-today/
तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर परिस्थितीचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते. अहिल्यानगर तालुका भूजल घटीत पहिल्या क्रमांकावर असून येथे 4.87 मीटरने पाणीपातळी खोल गेली आहे. जामखेडमध्ये 4.78 मीटर, शेवगावमध्ये 3.88 मीटर, राहुरीमध्ये 3.70 मीटर, पाथर्डीत 3.69 मीटर आणि श्रीगोंद्यात 3.20 मीटरची घट झाली आहे. नेवासा2.83 मीटर, कर्जत 2.78 मीटर, राहाता 2.62 मीटर, संगमनेर 2.13 मीटर, पारनेर 1.98 मीटर आणि अकोले 1.92 मीटर अशी घट नोंदविण्यात आली आहे. कोपरगावमध्ये 0.79 मीटर, तर श्रीरामपूरमध्ये सर्वात कमी 0.69 मीटरची घसरण झाली आहे. मात्र कमी घट असलेल्या तालुक्यांनाही आगामी काळात पाणीटंचाईपासून दिलासा मिळेलच, असे नाही.
भूजल पातळीतील ही घसरण म्हणजे भविष्यातील पाणीप्रश्नाचे गंभीर संकेत आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या भूजलाचा वापरही नियोजनाशिवाय सुरू राहिला, तर विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडण्याची वेळ येऊ शकते. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतीचे नियोजन करण्याऐवजी अमर्याद उपसा सुरू राहिला, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर टँकर पाठविण्यापेक्षा आजच भूजल बचतीचे कठोर नियोजन करणे आवश्यक आहे.
भूजलाच्या उपलब्धतेचा विचार करता आता पाण्याच्या वापराला मानवतावादी दृष्टिकोनातून प्राधान्य देण्याची गरज असल्याचे राज्य कार्याध्यक्ष आदर्शगाव योजना पोपटराव पवार यांनी स्पष्ट केले आहे. जमिनीखालील पाण्याचा उपसा सर्वप्रथम माणूस आणि जनावरे जगविण्यासाठी, म्हणजेच पिण्याच्या पाण्यासाठी केला पाहिजे. त्यानंतर पाणी शिल्लक राहिले तर फळबागा जगविण्याला प्राधान्य द्यावे. यापुढे पिकांसाठी भूजलाचा अनिर्बंध वापर करण्याची मानसिकता बदलली पाहिजे. पैशाच्या हव्यासापोटी जमिनीखालील पाणी संपविणे थांबवले पाहिजे, असे त्यांनी बजावले.
आगामी काळात खरी पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून भूजलसाठे रिकामे झाले, तर केवळ माणसांचेच नव्हे तर भूपृष्ठावरील झाडांचे आणि पर्यावरणाचेही अस्तित्व धोक्यात येईल. जमिनीला विश्रांती देण्याची वेळ आली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सरकारने गांभीर्याने हाताळावा. चारा पिकविण्यासाठी अडीच ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागतो आणि त्यासाठीही मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. त्यामुळे चाऱ्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि भूजलाचा वापर केवळ माणूस व जनावरे जगविण्याच्या दृष्टीनेच केला पाहिजे, असे परखड मत पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.