पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) दावा केला आहे की, त्यांनी बहरीनमधील लष्करी तळांवर तैनात असलेल्या अमेरिकेच्या दोन पॅट्रियटहवाई संरक्षण रडार प्रणालींना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लक्ष्य केले आहे. आपल्या हवाई हद्दीचे कथित उल्लंघन आणि हेंगाम बेटावरील रडार सुविधेवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला हे प्रत्युत्तर असल्याचे इराणने म्हटले आहे. दरम्यान, बहरीनमधील एका औद्योगिक सुविधेवर झालेल्या हल्ल्यानंतर आग लागल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी तेलवाहू जहाजांवरील हल्ले आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेने ड्रोन पाडल्याच्या दाव्यांमुळे सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.
इराणच्या आयआरजीसीने म्हटले आहे की, त्यांनी बहरीनच्या अल रफाह आणि अवाली हवाई तळांवरील अमिरेकी हवाई संरक्षण रडार प्रणालींना लक्ष्य केले. बहरीनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यामुळे एका औद्योगिक सुविधेला फटका बसला आणि आग लागली. अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण पथके ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हल्ल्यानंतर बहरीनने आपला सार्वजनिक इशारा मागे घेतला आणि परिस्थिती पूर्ववत झाल्याचे जाहीर केले. तथापि, अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/21/bjp-obc-morchas-national-executive-announced-new-appointments-to-various-posts/
इराणच्या संसदेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते इब्राहिम रझाई म्हणाले की, जर इराणी पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर तेहरान इस्रायली लक्ष्यांना लक्ष्य करून प्रत्युत्तर देईल. त्यांनी इशारा दिला की इराणच्या धमक्या केवळ पोकळ नाहीत, तर त्या कृतीतही उतरू शकतात. इराणी नौदलाच्या म्हणण्यानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील प्रतिबंधित क्षेत्रात एका तेलवाहू जहाजाने सागरी सुरुंगाला धडक दिल्याने त्याला आग लागली. दरम्यान, युके मेरिटाइम एजन्सीने ओमानच्या खसाब प्रदेशाच्या उत्तर आणि पूर्वेला दोन तेलवाहू जहाजांवर अज्ञात वस्तू आदळल्याचा अहवाल दिला आहे. या घटनांमुळे आखाती प्रदेशातील तेल वाहतुकीच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे.
इराणने एक एमक्यू ९ आणि एक एमक्यू १ प्रिडेटर ड्रोन पडल्याचा दावा केला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर दोन्ही ड्रोनला लक्ष्य करण्यात आले होते. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, जर तेहरानच्या अटी मान्य झाल्या तर ते होर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा उघडू शकतात. तथापि, त्यांनी ६० टक्क्यांपर्यंत समृद्ध केलेला आपला युरेनियमचा साठा दुसऱ्या देशाला पाठवण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारली.