टाळ-मृदंगाचा गजरात, हरिनामाचा जयघोष आणि विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात कार्तिकी एकादशीचा सोहळा शनिवारी पंढरपुरात उत्साहात पार पडला. या पावन पर्वावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.यावेळी राज्यातील शेतकरी सुखी-समृद्ध व्हावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि महाराष्ट्रावर सुख-समृद्धीची कृपा राहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी घातले.या शासकीय महापूजेला नांदेड जिल्ह्यातील उचेगाव येथील शेतकरी दाम्पत्य सुधाकर आणि प्रणिता शिंदे यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. वारकरी परंपरेचा सन्मान आणि बळीराजाच्या कष्टाला दिलेली ही मानवंदना ठरली.राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी विठुरायाकडे बळीराजाच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद नांदावा, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले. शेतकरी हा आपला अन्नदाता असून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटात वाऱ्यावर सोडणार नाही. दुष्काळग्रस्तांना अग्रिम मदत, पीक नुकसानभरपाई, विद्यार्थ्यांच्या शुल्कातील सवलत, कर्जवसुलीला स्थगिती यांसह आवश्यक त्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जातील,असे त्यांनी सांगितले.जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी आणि अन्नधान्याची उपलब्धता याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.दर्शनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांची भेट घेतली.पंढरपूरची वारी स्वच्छ, निर्मळ आणि पर्यावरणपूरक व्हावी, यासाठी प्रशासन, मंदिर समिती, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी घटकांनी एकत्रितपणे काम केले आहे. या सर्वांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.या शासकीय महापूजेला नांदेड जिल्ह्यातील उचेगाव येथील शेतकरी दाम्पत्य सुधाकर आणि प्रणिता शिंदे यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. वारकरी परंपरेचा सन्मान आणि बळीराजाच्या कष्टाला दिलेली ही मानवंदना ठरली.पंढरपुर येथे दर्शन मंडप, स्काय वॉक आणि टोकन पद्धतीची दर्शन रांग व्यवस्था उभारण्याच्या कामासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 129 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र ते पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याने शिंदे यांनी पर्यटन विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त 25 कोटी रुपये देण्याची घोषणा यावेळी केली.