हैदराबाद : प्रेमसंबंधातील दुराव्यामुळे एका तरुणीने आपल्या माजी प्रियकराला घाबरवण्यासाठी शक्कल लढवली, मात्र हीच क्लृप्ती तिच्या अंगलट आली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी प्रियकराला धाक दाखवण्यासाठी कथितपणे ChatGPT च्या मदतीने शी टीम्सच्या नावाने बनावट पोलीस नोटीस तयार करण्यात आली आणि ती WhatsApp वर पाठवण्यात आली. मात्र, पीडित तरुण ही नोटीस खरी मानून थेट शी टीम्सच्या कार्यालयात पोहोचला आणि तिथे गेल्यावर हा सगळा बनाव उघड झाला. या प्रकरणी सैफबाद पोलिसांनी तरुणी आणि तिला मदत करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकाटपल्ली हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील बालाजीनगर येथे राहणारा 24 वर्षीय थिरुनेश्वर वीरंकी याची महिंद्रा विद्यापीठातील 24 वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांमध्ये जवळपास 5 वर्षे प्रेमसंबंध होते. तरुणाने लग्नाचे आश्वासन दिले होते, मात्र गेल्या 1 वर्षापासून त्याने तिच्याशी अंतर राखले होते आणि सोशल मीडियावरही ब्लॉक केले होते, असा आरोप आहे. या परिस्थितीमुळे तरुणी प्रचंड तणावाखाली होती आणि त्यातूनच तिने त्याला घाबरवण्याचा हा मार्ग निवडल्याचे तपासात समोर आले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/mahabharat-fame-actor-ayush-shah-falls-victim-to-fraud-lured-by-the-promise-of-high-returns-he-gets-swindled-out-of-%e2%82%b94-44-crore/
अंतर ठेवलेल्या प्रियकराला धाक बसवण्याच्या उद्देशाने तरुणीने शी टीम्सच्या नावाने बनावट नोटीस तयार केली. ही नोटीस बनवण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर हरी नावाच्या व्यक्तीने ही नोटीस पीडित तरुणाच्या WhatsApp वर पाठवली. चौकशीसाठी शी टीम्स कार्यालयात हजर राहण्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. पीडित तरुणाने ही अधिकृत आणि खरी पोलीस नोटीस असल्याचे समजून पुढील पाऊल उचलले.
WhatsApp वर आलेली नोटीस खरी मानून थिरुनेश्वर चौकशीसाठी शी टीम्सच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. अधिकाऱ्यांनी नोटीसची कसून तपासणी केली असता ती पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर शी टीम्सचे एसआय वेंकटेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून सैफबाद पोलीस ठाण्यात तरुणी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या तरुणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेची कलमे 204, 319(2), 336(3), 340(2), 35(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(C) आणि 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा वापर करून बनावट अधिकृत कागदपत्रे तयार करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर इशारा दिला आहे.