अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर बडगा उगारला है. प्रशासनाने राज्यभरात मोठी धडक कारवाई करत तब्बल १.२७ कोटी रुपयांचा अयोग्य व असुरक्षित अन्नसाठा जप्त केला आहे. या मोहिमेत एकूण १२ नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून ६ विक्रेत्यांचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. याशिवाय, राज्यात १.६८ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू व गुटखा साठा जप्त करून ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबई व ठाण्यातील ९ नामांकित उपाहारगृहांचे परवाने निलंबित
अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी बृहन्मुंबई आणि कोकण विभागातील प्रमुख आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील ९ नामांकित उपाहारगृहांमध्ये अन्न तयार करण्याचे अस्वच्छ काउंटर, वैद्यकीय तंदुरुस्ती व FoSTaC प्रशिक्षण प्रमाणपत्राचा अभाव, वापरलेल्या तेलाच्या (TPC) नोंदी नसणे आणि FSMS आराखड्याचे पालन न केल्याचे आढळून आले. यामध्ये खालील प्रमुख आस्थापनांचा समावेश आहे:
- आयडियल रेस्टॉरंट (कॅफे आयडियल), कुलाबा
- चेतना प्रायव्हेट लि. (आयकॉनिक चेतना रेस्टॉरंट), फोर्ट
- अल अरेबियन एक्सप्रेस (मियां कबाब्स), फोर्ट
- चुल्हा रेस्टॉरंट (बायरूट), कफ परेड
- नॅचरल आइस्क्रीम, चर्चगेट
- श्रीयोग रेस्टॉरंट, फोर्ट
- गुप्ता फ्रूट ज्यूस सेंटर, नरीमन पॉईंट
- प्रकाश डोसा, फोर्ट
- सौरभ हॉटेल्स, कुलाबा
https://www.prahaar.in/2026/11/18/provide-skill-training-to-local-youth-alongside-port-projects-minister-nitesh-rane/
तसेच ठाणे विभागातील मे. ब्लिंक कॉमर्स प्रा. लि., मे. ब्रोड्यामा फूड्स एलएलपी आणि मे. सागर स्वीट अँड बेकरी या ३ आस्थापनांचे परवाने देखील अन्न सुरक्षेचे नियम मोडल्यामुळे निलंबित करण्यात आले आहेत. निलंबन काळात या आस्थापनांना अन्नपदार्थांची खरेदी-विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
खाद्यतेल, सुपारी आणि केटरर्सवर मोठी कारवाई
- पुणे (मावळ): मे. अव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. (डी-मार्ट) येथे केलेल्या तपासणीत कमी दर्जाचे आणि चुकीचे लेबलिंग (Misbranded) असलेले २०,०८५ लिटर खाद्यतेल (किंमत ₹५०,२७,८९३) जप्त करण्यात आले.
- नागपूर: वैशाली नगरमधील मे. चापरे रोस्टिंग वर्क आणि मे. न्यू माधव रोस्टिंग या दोन सुपारी युनिट्सवर छापा टाकून, कमी दर्जाची व भेसळयुक्त २५,३५७ किलो सुपारी (किंमत ₹७५,१९,६५४) जप्त करण्यात आली.
- पुणे (माणिकबाग खाऊ गल्ली): ‘ईट राईट स्ट्रीट’ मोहिमेतविनापरवाना आणि अस्वच्छतेत व्यवसाय करणाऱ्या ६ खाद्यविक्रेत्यांना ‘व्यवसाय बंद’ (Stop Business) नोटीस बजावण्यात आली.
- अकलूज (सोलापूर): मे. मातेश्वरी केटरर्स येथे मुदतबाह्य आणि अनारोग्यकारक मुदतीचा १४४ किलो अन्नसाठा (तूप, पीठ, बेसन, शेव) जप्त करण्यात आला.
https://www.prahaar.in/2026/11/18/the-89th-meeting-of-the-board-of-directors-of-the-maharashtra-maritime-board-was-held-under-the-chairmanship-of-minister-nitesh-rane/
प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कायदेशीर बडगा
बृहन्मुंबई, पुणे, कोकण, नाशिक आणि नागपूर विभागात गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विरोधात व्यापक मोहीम राबविण्यात आली. बोरिवली येथील एका दुकानावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले असून, राज्यभरात एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर असून, जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाच्या आयुक्तांनी दिला आहे.