नेमकी कोणत्या वेळेत सेवा बंद राहणार?
SBI ने आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 1 वाजून 15 मिनिटांपासून ते पहाटे 2 वाजेपर्यंत बँकेच्या UPI सेवा बंद राहतील. ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि चांगला डिजिटल बँकिंग अनुभव देण्यासाठी हे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
मात्र, हे काम निर्धारित वेळेच्या आधी पूर्ण झाल्यास सेवा लवकर सुरू होऊ शकते, असेही बँकेने स्पष्ट केले आहे. या काळात ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल SBI ने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Due to scheduled maintenance activity, SBI UPI services will be temporarily unavailable from 01:15 hrs to 02:00 hrs (IST) on 19.11.2026. The activity may, however, be completed early. Customers may continue to use UPI Lite Services for uninterrupted service. We regret the inconvenience caused to our customers.
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 18, 2026
UPI सेवा बंद असताना पेमेंट कसे कराल?
या 45 मिनिटांच्या कालावधीत एखादे महत्त्वाचे पेमेंट करायचे असल्यास ग्राहक UPI Lite सुविधेचा वापर करू शकतात. SBI ने ग्राहकांना या पर्यायाचा सल्ला दिला आहे. BHIM SBI Pay ॲपच्या माध्यमातून UPI Lite वॉलेटमध्ये आधीच पैसे जमा करून ठेवता येतात. त्यामुळे UPI सेवा तात्पुरती बंद असतानाही UPI Lite च्या माध्यमातून पात्र व्यवहार करता येऊ शकतात.
UPI Lite म्हणजे काय? व्यवहारांची मर्यादा किती?
UPI Lite ही छोट्या रकमेच्या डिजिटल व्यवहारांसाठी उपलब्ध असलेली वॉलेटसारखी सुविधा आहे. या माध्यमातून पेमेंट करताना प्रत्येक वेळी UPI PIN टाकण्याची गरज नसते.
RBI च्या नियमांनुसार, UPI Lite द्वारे एका व्यवहारात जास्तीत जास्त 1,000 रुपये पाठवता येतात. तसेच या वॉलेटमध्ये एकावेळी कमाल 5,000 रुपयांपर्यंत शिल्लक ठेवता येते.
त्यामुळे SBI ग्राहकांनी नियोजित देखभाल दुरुस्तीच्या वेळेची नोंद ठेवावी आणि आवश्यक असल्यास UPI Lite मध्ये आधीच पैसे जमा करून ठेवावेत.