मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बुधवारी आढावा घेण्यात आला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आणि भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौध्द भिख्खू संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.prahaar.in/2026/11/18/in-the-state-there-will-henceforth-be-an-eight-hour-workday-and-a-48-hour-weekly-limit/
महापरिनिर्वाण दिनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मागील वर्षांच्या अनुभवातून निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. महापरिनिर्वाण दिनाच्या आयोजनात समन्वय समिती, बौद्ध संघटना आणि विविध संस्थांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्थांची जबाबदारी पार पाडण्यात येत असली तरी या उपक्रमाच्या प्रभावी आयोजनासाठी सर्व संबंधित घटकांचा समन्वय आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, प्रशासकीय विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. यंदाही प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात.
इंदू मिल स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
https://www.prahaar.in/2026/11/18/kate-middleton-declines-to-give-an-autograph-to-a-fan-in-mumbai-what-is-the-exact-reason/
दादर स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात
दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.