Home ब्रेकिंग न्यूज BMC Hospitals: महानगरपालिकेच्या रूग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना ३ दिवसांत मिळणार जन्माचा दाखला

BMC Hospitals: महानगरपालिकेच्या रूग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना ३ दिवसांत मिळणार जन्माचा दाखला

0
BMC Hospitals: महानगरपालिकेच्या रूग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना ३ दिवसांत मिळणार जन्माचा दाखला
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित चार प्रमुख रूग्णालये आणि १६ उपनगरीय रूग्णालये याठिकाणी जन्माला येणाऱ्या बालकांना रूग्णालयाच्या ठिकाणीच जन्माचा दाखला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रूग्णालयाच्या परिसरात घडणाऱ्या जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी संबंधित संस्थांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधिक्षक यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे. यामुळे जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल. सेवा हमी कायद्यान्वये महानगरपालिका रूग्णालयात जन्माला आलेल्या बालकांचा अवघ्या तीन दिवसात जन्म दाखला उपलब्ध होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने जन्म आणि मृत्यू नोंदीसाठी प्रमुख रूग्णालये आणि उपनगरीय रूग्णालये याठिकाणी संबंधित संस्थांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधिक्षकांना अधिकार देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारने भारताचे रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे ही विनंती मांडली होती. भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी संपूर्ण प्रक्रियेला मंजूरी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करणे शक्य झाले आहे. जन्म आणि मृत्यू नोंदीसाठी मिळालेल्या परवानगीमुळे प्रशासकीय विभागाच्या ठिकाणी नागरिकांना जन्म दाखल्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही.
https://www.prahaar.in/2026/11/17/mayor-takes-note-of-issues-at-the-gujarati-hindu-cremation-ground-in-bhandup-west/
महानगरपालिकेच्या प्रमुख रूग्णालये आणि उपनगरीय रूग्णालयाच्या ठिकाणी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांच्या जन्म नोंदीच्या प्रक्रियेसाठी पालकांना विभाग कार्यालयात जाण्याची आता गरज नाही. नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी, तसेच संपूर्ण प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आवश्यक लॉग इन आयडी या रूग्णालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)  प्राजक्ता लवंगारे यांनी दिली.
मुंबईतील शासकीय रूग्णालयांमध्ये सर जे जे रूग्णालय,  महानगरपालिका संचलित प्रमुख रूग्णालयांमध्ये राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रूग्णालय, बायल नायर रूग्णालय, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय, रू न कूपर रूग्णालय आणि १६ उपनगरीय रूग्णालयांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रूग्णालयाच्या परिसरात घडणाऱ्या जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी संबंधित संस्थांच्या अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधिक्षक यांना अधिकार देण्यात आले आहेत. जन्म – मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ (सुधारित २०२३) तसेच जन्म – मृत्यू नोंदणी नियम २००० मधील तरतुदींनुसार जन्म व मृत्यू घटनांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.  पालकांना जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रूग्णालयातून घरी गेल्यानंतर स्वतंत्रपणे पाठपुरावा करण्याची गरज भासणार नाही. नवजात बालकाची जन्माची नोंदणी झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत जन्म प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here