Home महाराष्ट्र अहिल्यानगर अहिल्यानगर मनपात महापौरांचा अचानक छापा; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा दणका

अहिल्यानगर मनपात महापौरांचा अचानक छापा; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा दणका

0
अहिल्यानगर मनपात महापौरांचा अचानक छापा; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा दणका
अहिल्यानगर मनपात महापौरांचा अचानक छापा

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन वेळेच्या शिस्तीचा अभाव असल्याचे मंगळवारी (दि. 17 नोव्हेंबर) महापौर सौ. ज्योतीताई अमोल गाडे यांच्या निदर्शनास आले. सकाळी 9.30 वाजता महापौर गाडे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात दाखल झाल्या असता, बहुतांश कर्मचारी निर्धारित वेळेत कामावर हजर नसल्याचे आढळून आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापौरांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी मस्टरची तपासणी करून त्यांच्या हजेरी पत्रकावर लेटमार्क नोंदविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

महापौर ज्योती गाडे यांनी उशिरा कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांचे हजेरी मस्टर बुक ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यावर उशिराचा शेरा मारत संबंधित कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रकावर लेटमार्क नोंदविण्याची कार्यवाही सुरू केली. तसेच महापालिकेतील विविध विभागांच्या कार्यालयांची पाहणी करून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

नागरिक आपल्या विविध कामांसाठी सकाळी 10 वाजल्यापासून महापालिकेत येत असतात. मात्र, कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागत नाहीत. यावेळी पुण्याहून दाखला मिळविण्यासाठी एक महिला सकाळी पावणेदहा वाजता महापालिकेत आल्या होत्या. मात्र, ज्या विभागात त्यांचे काम होते, त्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे संबंधित महिलेने नाराजी व्यक्त केली.

https://www.prahaar.in/2026/11/17/raids-on-country-liquor-dens-in-ahilyanagar-goods-worth-1-92-lakh-seized-cases-filed-against-4-people/

हा प्रकार पाहून महापौरांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच खुर्ची टाकून महापौर ज्योतीताई गाडे यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यावेळी त्यांनी कार्यालयीन शिस्तीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करणे अपेक्षित असताना बहुतांश कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे महापौरांनी यापुढे कर्मचाऱ्यांच्या वेळेतील अनियमिततेकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रकावर नियमानुसार लेटमार्क नोंदविण्याचे निर्देशही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

महापौरांच्या या अचानक पाहणीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, लेटमार्कची नोंद झालेल्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून पुढे नेमकी काय कारवाई केली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here