Home ताज्या घडामोडी MHT CET 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा दोनदा होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर

MHT CET 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा दोनदा होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर

0
MHT CET 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा दोनदा होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा तब्ब्ल 21 सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यापैकी 11 अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.

चंद्रकांतदादा पाटील काय म्हणाले?

यावर्षापासून म्हणजे शैक्षिणक वर्ष 2027 पासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM), पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (PGCM) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (GNM) या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रथमच घेतल्या जाणार आहेत. जानेवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन 10 जून 2027 पर्यंत विविध सीईटी परीक्षा पार पडणार आहेत, चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले. 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 20 सीईटी परीक्षांसाठी 18 लाख 14 हजार 456 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 16 लाख 31 हजार 335 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने यंदा दोन वेळा सीईटी घेण्यात येणार असून अभ्यासक्रमांची संख्या तीनवरून 11 करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/16/tejran-wedding-news-are-karan-kundrra-and-tejasswi-prakash-set-to-tie-the-knot-soon-rumors-suggest-they-might-take-their-saat-phere-wedding-vows-in-desi-bling-2/

11अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा

राष्ट्रीय स्तरावर जेईई (JEE) मेनच्या दोन परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही दोन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मागील वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी दोन वेळा घेण्यात येत आहेत. या प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यावर्षी आणखी आठ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पीसीएम, पीसीबी, एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम अशा एकूण 11 अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना पहिली सीईटी देणे बंधनकारक असून दुसरी सीईटी ऐच्छिक असणार आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल गुण असतील, तेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार यंदा पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी घेण्यात येणार आहे. यामध्ये पीजीडीएम आणि पीजीसीएम या अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार आहे.

सीईटीच्या संभाव्य तारखा

एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम यांची पहिली परीक्षा 28 ते 30 जानेवारी 2027 रोजी होणार असून दुसरी परीक्षा 1 ते 3 एप्रिल 2027 रोजी होणार आहे. पाच वर्षीय एलएलबीची पहिली परीक्षा 28 ते 29 मार्च तर दुसरी परीक्षा 24 मे 2027 होण्याची शक्यता आहे. पीसीबी समूहाची पहिली परीक्षा ही 8 ते 13 एप्रिल रोजी होणार असून दुसरी परीक्षा 6 ते 8 मे 2027 रोजी होणार आहे.

पीसीएम समूहाची पहिली परीक्षा 16 ते 26 एप्रिल रोजी असून दुसरी परीक्षा 10 ते 15 मे 2027 रोजी पार पडणार. बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम यांची पहिली परीक्षा 28 ते 30 एप्रिल तर दुसरी परीक्षा 27 ते 28 मे 2027 ला पार पडणार.

अन्य अभ्यासक्रमांच्या सीईटीचे वेळापत्रक

एम.एचएमसीटी 24 मार्च, एमसीए 27  मार्च, एएसी (कला शिक्षण) 11 एप्रिल, बी.डिझाईन 18 एप्रिल, तीन वर्षीय एलएलबी 4 व 5 मे, डीपीएन/पीएचएन 18 मे, नर्सिंग 18 व 19 मे, जीएनएम नर्सिंग 21 व 22 मे, एमपीएड 5 जून, एमएड 6 जून, तर बीएड (जनरल व स्पेशल), बीएड (ईएलसीटी) आणि बीपीएड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा 8 ते 10  जून 2027 दरम्यान होणार आहेत.

दरम्यान, तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी यंदा घेतली जाणार नाही. राज्यात हा अभ्यासक्रम एकाच संस्थेत सुरू असून, एकूण 55 जागांपैकी यंदा केवळ 12 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here