Home ब्रेकिंग न्यूज Chhagan Bhujbal : अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलिनीकरणाबाबत माझ्यासमोरच चर्चा

Chhagan Bhujbal : अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलिनीकरणाबाबत माझ्यासमोरच चर्चा

0
Chhagan Bhujbal : अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलिनीकरणाबाबत माझ्यासमोरच चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आला असताना, यापूर्वीही या विषयावर चर्चा झाल्याचा दावा ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ‘अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात विलिनीकरणाबाबत माझ्याच उपस्थितीत ४० ते ४५ मिनिटे चर्चा झाली होती. दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी भूमिका मी त्यावेळी मांडली होती,’ असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. मात्र, त्या चर्चेनंतर पुढे काहीच घडले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते आजारी असताना जयंत पाटील त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, असे मत त्यांनी पाटील यांच्याकडे व्यक्त केले. त्यावर पाटील यांनी, आपण सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग आहात, त्यामुळे आपल्या मित्रपक्षांना हे मान्य होईल का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर राष्ट्रवादीचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत अजित पवार याबाबत निर्णय घेतील आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा होईल, असे आपण सांगितल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

भुजबळ म्हणाले, ‘दोन्ही बाजूंनी सांघिक पद्धतीने चर्चा झाली पाहिजे. आमच्यातील एखादा नेता दुसऱ्याला भेटतो आणि चर्चा करतो, असे प्रकार सुरू आहेत. क्रिकेटचा खेळ सुरू असल्यासारखी परिस्थिती आहे. तुटक तुटक चर्चा नको, सर्वांनी एकत्रितपणे बोलले पाहिजे. आम्हीही अनेक गोष्टी प्रसारमाध्यमांतूनच ऐकतो,’ असे ते म्हणाले. ‘माझ्या आयुष्यात दोन मार्गदर्शक भेटले. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. बाळासाहेब आता नाहीत, तर शरद पवार दुसऱ्या पक्षात आहेत. मात्र, त्यांच्याशी आमचे संबंध कायम आहेत. राजकारणात विरोधक असले तरी ते संबंध जपतात. दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या जातात,’ असे भुजबळ म्हणाले.

https://www.prahaar.in/2026/11/13/emails-couldnt-be-sent-meetings-got-stalled-work-disrupted-due-to-a-glitch-in-microsofts-servers/

सुनेत्रा पवार आम्हाला विश्वासात घेतील

विलिनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार योग्य वेळी निर्णय घेतील आणि त्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घेतील, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. दोन्ही गट एकत्र आल्यास आनंदच होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीत शरद पवार आणि आपण सुरुवातीपासून सहभागी होतो, नंतर इतर नेते पक्षात आले, असे सांगत जुन्या जाणत्या नेत्यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here