नंदुरबार : राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आला असतानाच, या प्रक्रियेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना लक्ष्य केले जात असल्याबद्दल त्यांच्या कन्या आणि राज्याच्या मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरे व्हिलन का ठरत आहेत ? याचे मला एक मुलगी म्हणून नेहमीच दुर्दैव वाटते,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नंदुरबार दौऱ्यावर असताना त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी विलीनीकरण, महायुतीतील समन्वय, अर्थखाते आणि लाडकी बहीण योजनेवर सविस्तर भाष्य केले.
पुण्यातील बैठकीचे निमंत्रण नाही; कामावर लक्ष केंद्रित
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात पुण्यात होणाऱ्या बैठकीबाबत विचारले असता अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, या बैठकीसाठी त्यांना कोणतेही निमंत्रण देण्यात आलेले नाही किंवा त्यासंदर्भात कोणाचा फोनही आलेला नाही. सध्या राजकीय घडामोडींपेक्षा आपल्याकडे असलेल्या विभागाच्या कामावर आणि जबाबदारीवर आपण अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अजितदादा आणि तटकरेंची मैत्री काँग्रेस काळापासूनची
https://www.prahaar.in/2026/11/13/good-heavens-a-government-official-found-in-possession-of-a-palatial-mansion-worth-7-crores-and-25-acres-of-land-he-broke-into-a-cold-sweat-the-moment-the-raid-took-place/
सुनील तटकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना अदिती तटकरे म्हणाल्या की, “अजितदादा आणि सुनील तटकरे यांची मैत्री ही काँग्रेसमध्ये असल्यापासूनची जुनी आहे. एक मित्र म्हणून सुनील तटकरे यांनी आजवर जी काही कर्तव्ये आहेत, ती प्रामाणिकपणे पार पाडली आहेत. राजकारणात टीका-टिप्पणी होतच असते; मात्र त्याकडे लक्ष न देता तटकरे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून, अजितदादांच्या कुटुंबाप्रती आणि मैत्रीच्या नात्याने आपली जबाबदारी पार पाडत आहेत.”
सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय मान्य
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलताना अदिती तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विलीनीकरणासंदर्भात शरद पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि दोन्ही बाजूंचे वरिष्ठ नेते बसून योग्य तो निर्णय घेतील. “या विषयावर सुनेत्रा पवार जो काही निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना आणि मला वैयक्तिकरित्याही मान्य असेल,” असे त्या म्हणाल्या.
लाडकी बहीण योजना आणि अर्थखात्याबाबत भूमिका
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला अजितदादांचे नाव देण्याच्या मागणीवर बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा लाभ १२०० रुपयांवरून १५०० रुपये करण्याचे महत्त्वाचे काम केले असून, लाडक्या बहिणींसोबतच राज्यात आता ‘लाडके भाऊ’ही तयार झाले आहेत, असेही त्या म्हणाल्या. तसेच, अर्थखात्याच्या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून, त्यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले.
रामदास कदम यांना प्रत्युत्तर; महायुतीत मिठाचा खडा नको
महायुतीतील नेत्यांकडून होणाऱ्या टीका-टिप्पणीवर भाष्य करताना अदिती तटकरे यांनी संयम बाळगण्याचा सल्ला दिला. महायुतीत कोणताही ‘मिठाचा खडा’ पडणार नाही, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. “जबाबदारी ही कधीही एका बाजूने पार पाडली जात नसते,” अशा शब्दांत त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या टीकेला नाव न घेता किंवा थेट प्रत्युत्तर दिले.