बुधवारी (११ नोव्हेंबर) सकाळी गुवाहाटीजवळील दिगारू रेल्वे स्थानकावर मिझोरमला जाणाऱ्या कोलकाता सैरंग एक्सप्रेसचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. मिझोरम ते कोलकाता हा नेहमीच प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रवास धक्कादायक ठरला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ट्रेन कोलकाताहून मिझोरममधील सैरंगकडे जात होती. नॉर्थइस्ट फ्रंटियर रेल्वेचे (NFR) मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) के. के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ६ वाजून ५४ मिनिटांनी आसाममधील दिगारू रेल्वे स्थानकावर दुसऱ्या गाडीला प्राधान्य देण्यासाठी गाडी क्रमांक १३१२५ कोलकाता – सैरंग एक्सप्रेस थांबवली जात असताना लोको पायलटला वेग नियंत्रित करता आला नाही. यामुळे गाडी रुळावरून खाली घसरण्याची दुर्घटना घडली. यामध्ये इंजिनसह सहा डबे रुळावरून घसरले.
सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. प्रवाशांना पर्यायी ट्रेनने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले जात आहे, अशी माहिती देखील शर्मा यांनी दिली. घटनेनंतर तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले. एनएफआरचे महाव्यवस्थापक, इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसह कार्याची देखरेख करण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.
आसाममध्ये रेल्वे अपघात! कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे इंजिनसह ६ डबे रुळावरून घसरले; सर्व प्रवासी सुरक्षित
.
.
.
#AssamTrainAccident #KolkataSairangExpress #TrainDerailment #IndianRailways #BreakingNews #prahaarnewsline https://t.co/f33LB5JRd8— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) November 11, 2026
नुकसान झालेला रेल्वेमार्ग मोकळा करून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पथकेही काम करत होती. गाडी रुळावरून घसरल्यामुळे या मार्गावरील सेवा विस्कळीत होऊ शकतात. कोलकाता सैरंग एक्सप्रेस ही मिझोरम आणि पूर्व भारत यांच्यातील एक महत्त्वाची रेल्वे जोडणी आहे. या सेवेमुळे मिझोरमची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारते आणि हे राज्य ईशान्य भारताबाहेरील प्रमुख ठिकाणांशी जोडले होते.