महाराष्ट्र: सध्या राज्यभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यंदाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून जलसंकट गडद झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून, जिथे खरोखर गरज आहे तिथे झाडे जगविण्यासाठी आणि केवळ शेतीकामाकरिता विंधन विहिरींवरील बंदी येत्या 15 डिसेंबरपर्यंत उठविण्यात येत असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/08/government-schemes-for-tribal-communities-tribal-people-to-receive-immediate-benefits-under-one-roof-a-mega-event-for-government-schemes-to-be-held-in-the-presence-of-judges/
मुख्यमंत्री फडणवीस यांनी याच गावात मुक्काम करून ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर सकाळी पुढील दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांनी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत सरपंचांशी आणि लोकप्रतिनिधींशी सविस्तर संवाद साधला. या संवादादरम्यान लोकप्रतिनिधींनी यंदाच्या भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेले जलसंकट आणि शेतातील पिके मातीमोल होत असल्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावर तात्काळ प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “विंधन विहिरींचे खोलीकरण किंवा नवीन विंधन विहिरी खोदण्यावरील बंदी उठवणे सरकारसाठी काहीसे कठीण आहे. मात्र शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहता विशेष बाब म्हणून हा निर्णय घेतला जात आहे.”
मात्र, ही सवलत सरसकट लागू असणार नाही, हे स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल आणि ही बंदी केवळ झाडे जगविण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणीच शिथिल केली जाईल. याचबरोबर, पाण्याची नासाडी टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि जास्तीत जास्त जलपुनर्भरण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या बैठकीत परिसरातील पशुधनाचा मुद्दाही ऐरणीवर आला. विभागात मोठ्या प्रमाणावर पशुधन असूनही पशू दवाखान्यांची वानवा असल्याची व्यथा स्थानिकांनी मांडली. या गंभीर समस्येची दखल घेत, गुरांच्या दवाखान्यांच्या परिस्थितीची त्वरित पाहणी करून तातडीने योग्य निर्णय घेण्याचे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/08/mumbai-maharashtra-diwali-weather-update-unpredictable-temperature-drop-or-extreme-heat-alert/
तसेच, रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांवर बोलताना ते म्हणाले की, निधीच्या कमतरतेमुळे काही कामे अपूर्ण राहिली आहेत, पण आता ती प्राधान्याने पूर्ण केली जातील. जी कामे 75 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाली आहेत, त्यांना तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय, वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे होत असलेले नुकसान ही एक गंभीर समस्या बनली असून, यासाठी तार कुंपण योजना आणखी व्यापक करण्यात येणार आहे. विशेषतः जंगलाला लागून असलेल्या शेत जमिनींना या योजनेत प्राधान्य दिले जाईल. जलसाठ्यांमधील गाळ काढून ती सुपीक माती शेतात टाकण्याचे कामही सध्या वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दौऱ्यादरम्यान काही महिला सरपंचांनी काही लोक पत्रकार असल्याचे भासवून पैशाची मागणी करत असल्याची धक्कादायक तक्रार केली. यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत, ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकले जाईल, असा सज्जड दम मुख्यमंत्री फडणवीस यांनी भरला असून पोलिस प्रशासनाला याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.