निर्माती प्रियंका चोप्रा यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘व्हेंटिलेटर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पर्पल पेबल पिक्चर्स आणि मॅगीज पिक्चर्स यांनी नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे. दहा वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या कामेरकर कुटुंबाने प्रेक्षकांना हसवलं, भावूक केलं आणि नात्यांचे अनेक रंग दाखवले. रुग्णालयाच्या परिसरात घडणाऱ्या या कथेतील प्रत्येक व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, आपापसातील गंमतीशीर संवाद आणि भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले. आता याच कामेरकर कुटुंबाची गोष्ट पुढे नेण्यासाठी दिग्दर्शक राजेश मापुस्कर सज्ज झाले आहेत.
काही चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही तर त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. त्यातीलच एक म्हणजे व्हेंटिलेटर. ‘घ्या रे घ्या सारे घ्या…’ या खास अंदाजातील टॅगलाईनमुळे चित्रपटाच्या घोषणेला आणखी एक वेगळी रंगत आली आहे. ‘तेच सगळे कामेरकर, पुन्हा एकदा 10 वर्षांनंतर… त्यांच्यातले काही गेले, काही राहिले… गेलेले हसतायत आणि राहिलेले…!’ अशा मिश्किल शब्दांत ‘व्हेंटिलेटर 2 ’ची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी कथा नेमकी काय असेल, पहिल्या चित्रपटातील नात्यांचा गोडवा, कौटुंबिक गंमतीजंमती आणि भावनिक क्षण पुन्हा अनुभवायला मिळणार का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/07/on-one-hand-i-have-come-to-live-at-the-bandekar-household-while-on-the-other-i-have-made-a-place-in-the-audiences-hearts-as-shivani-kadam-pooja-birari/
याबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी, “‘व्हेंटिलेटर’ चित्रपटासोबत माझ्या अनेक आठवणी आणि भावना जोडल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आजही मनात ताजं आहे. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच विश्वात परतताना एक वेगळाच आनंद आणि जबाबदारीची जाणीव आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.” असे सांगितले.
View this post on Instagram
तर निर्मात्या प्रियंका चोप्रा जोनस आणि डॉ. मधु चोप्रा यांनी, “‘व्हेंटिलेटर’ला मिळालेलं प्रेम आमच्यासाठी नेहमीच खास राहिलं आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे या कथेचा पुढचा भाग घेऊन येणं हा आमच्यासाठी आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय आहे. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा या कुटुंबाला एकत्र आणताना पहिल्या भागाशी जोडलेल्या आठवणी आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा या दोन्हींचा विचार केला आहे. यावेळीही प्रेक्षकांना हसवणारा, विचार करायला लावणारा आणि मनाला भिडणारा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असेल.” असे सांगितले.
चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून या नव्या पर्वाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. आता दहा वर्षांनंतर कामेरकर कुटुंबात नेमकं काय घडणार, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.