कल्याण : वर्षानुवर्षे अंधारात जीवन जगणाऱ्या टिटवाळ्यातील आदिवासी पाड्यांवर अखेर प्रकाशाची किरणे पोहोचली आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 5 नोव्हेंबर रोजी 50 नवीन पथदिवे सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीची दखल घेत पालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे आदिवासी पाड्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने प्रकाशमय झाली आहे.
महिला आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटणार
काही आठवड्यांपूर्वी विविध आदिवासी पाड्यांतील रहिवाशांनी केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली होती. रस्त्यांवर पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेषतः महिला आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न त्यांनी आयुक्तांसमोर मांडला. या समस्येची तातडीने दखल घेत आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले. अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाने वेगाने काम पूर्ण करत दिवाळीपूर्वीच आदिवासी पाड्यांवर उजेड आणला.
https://www.prahaar.in/2026/10/28/diwali-gift-of-15500-rupees-announced-for-4101-employees-of-the-bhiwandi-municipal-corporation/
22 आदिवासी पाड्यांमध्ये 185 पथदिवे सुरू
केडीएमसीच्या आकडेवारीनुसार, टिटवाळा परिसरात एकूण 22 आदिवासी पाडे आहेत. 2024 ते 2026 या कालावधीत या वस्त्यांमध्ये 185 पथदिवे सुरू करण्यात आले आहेत. 2026-27 या वर्षासाठी आणखी 100 पथदिवे सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यापैकी 50 दिवे 5 नोव्हेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आले. नवीन पथदिवे सुरू करण्यात आलेल्या भागांमध्ये ठाकूर पाडा (6), गणेश विद्यालय-एमटीडीसी आदिवासी पाडा (8), गणेश मंदिर आदिवासी पाडा (11), गणेशवाडी दर्गा परिसर (11), बिर्ला कॉलेजमागील मिलिंद नगर (2), इंदिरा नगर (3), वाघमारे आळी (4), कल्याणमधील काटकर वस्ती (1) आणि आधारवाडी तुरुंगामागील वस्ती (4) यांचा समावेश आहे.
ग्रामस्थांची दिवाळी झाली प्रकाशमय
पालिकेच्या या जलद आणि लोककल्याणकारी निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या वस्त्यांमध्ये पथदिवे सुरू झाल्याने रात्रीच्या वेळी सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. उर्वरित 50 पथदिवेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.