मुंबई (विशेष प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७० वा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर २०२६ रोजी आहे. या अनुषंगाने दादर (पश्चिम) येथील चैत्यभूमी तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात आवश्यक त्या नागरी सेवा-सुविधा प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही उपलब्ध करून देण्यात येतील. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात येणाऱ्या अनुयायांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी संबंधित अधिकारी व विभागांना दिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागांनी विशेष खबरदारी घ्यावी. तसेच, सजगतेने व समन्वयाने कार्यरत राहून प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचनाही भिडे यांनी यावेळी दिल्या.
https://www.prahaar.in/2026/11/05/emraan-hashmi-dangerous-look-gunmaster-g9-new-poster-released-box-office-clash/
महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस नगरसेवक अनिल कदम,अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवांगरे, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (परिमंडळ ७) मनीष वळंजू, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई, ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी व सदस्य तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारीही उपस्थित होते.
आढावा बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेमार्फत दादर येथील चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अधिक दर्जेदार सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच, ज्या ठिकाणी अतिरिक्त सेवा-सुविधांची आवश्यकता असेल, त्या ठिकाणी त्यांचे योग्य नियोजन करावे. सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परांमध्ये सुयोग्य समन्वय राखून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे यांनी बैठकीच्या प्रास्ताविकात महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रामुख्याने चैत्यभूमी स्मारक, तोरणा प्रवेशद्वार, अशोक स्तंभ, भीमज्योत व परिसराची रंगरंगोटी, उद्यान परिसराचे सुशोभीकरण, अभिवादनासाठी पुष्पचक्रांची व्यवस्था, टेहळणी मनोरा, नियंत्रण कक्ष, भागोजी कीर स्मशानभूमी येथे अनुयायांच्या रांगेच्या दोन्ही बाजूंना पडदे लावणे, स्थळदर्शक फुग्याची व्यवस्था, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेत प्रतीक्षेत असलेल्या अनुयायांसाठी तात्पुरते छत व आसनव्यवस्था, पोलीस विभागामार्फत शासकीय मानवंदना, पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व वितरण, अनुयायांच्या निवासासाठी जलरोधक (वॉटरप्रूफ) तात्पुरत्या मंडपाची उभारणी, चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात माहितीपर आणि दिशादर्शक फलक लावणे, मैदान परिसरात धूळप्रतिबंधक उपाययोजना, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय सेवा-सुविधा, भोजन मंडप, भन्तेजींसाठी ध्यानसाधना कक्ष, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, फिरत्या शौचालयांची सुविधा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन यंत्रणेची सज्जता तसेच भ्रमणध्वनी (मोबाईल) चार्जिंग सुविधा आदींचा समावेश आहे.