Home ब्रेकिंग न्यूज Vantara : गुजरातमधून सिंह आणण्यासाठी महापालिकेला वनताराची होणार मदत?

Vantara : गुजरातमधून सिंह आणण्यासाठी महापालिकेला वनताराची होणार मदत?

0
Vantara : गुजरातमधून सिंह आणण्यासाठी महापालिकेला वनताराची होणार मदत?
गुजरातमधून सिंह आणण्यासाठी महापालिकेला वनताराची होणार मदत?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थातच राणीबागेत चार आशियाई सिंह आणण्याची वाट मोकळी झाली असली तरी त्या बदल्यात द्यावयाच्या टफ्टेड कॅपुचिन माकडांची व्यवस्था करण्याचे नवे आव्हान मुंबई महापालिकेसमोर उभे राहिले आहे. गुजरातमधील जुनागढ येथील साकरबाग प्राणिसंग्रहालयाला सिंहांच्या बदल्यात टफ्टेड कॅपुचिन माकडांच्या तीन जोड्या देण्याचे निश्चित केले आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या राणीबागेत या जातीची माकडे उपलब्धच नसल्याने आता वनतारा येथून ही माकडे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार असून, ते शक्य न झाल्यास दक्षिण आफ्रिकेतून आयात करण्याचा पर्यायही विचाराधीन आहे.

विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वीही सिंहांच्या बदल्यात झेब्रा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, महापालिकेकडे झेब्रा उपलब्ध नसल्याने सिंह आणण्याचा प्रस्ताव रखडला होता. आता झेब्र्यांऐवजी टफ्टेड कॅपुचिन माकडांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सिंहांच्या आगमनासाठी महापालिकेला पुन्हा एकदा प्राण्यांची व्यवस्था करण्याची करावी लागणार आहे.

या माकडांची खरेदी करण्यासाठी महापालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी अधिकृत एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. वनतारा येथे ही माकडे उपलब्ध असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांना मिळाली आहे. त्यामुळे तेथून माकडे मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अन्यथा दक्षिण आफ्रिकेतून त्यांची आयात केली जाईल. या प्रक्रियेसाठी किती खर्च येणार, याची माहिती अद्याप उपलब्ध नसली तरी हा खर्च सीएसआर निधीतून करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. ही माकडे राणीबागेत ठेवण्यात येणार नसून, थेट जुनागढ येथील साकरबाग प्राणिसंग्रहालयाला पाठवली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. झेब्रा उपलब्ध नसल्यामुळे सिंह राणीबागेत येऊ शकले नाहीत, असे समजल्यानंतर आपण या प्रस्तावाचा पाठपुरावा केला असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

राणीबागेला १२ वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा

दरम्यान, मुंबईच्या राणीबागेत गेल्या १२ वर्षांपासून सिंह नाहीत. २०१४ मध्ये जिमी या शेवटच्या सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर येथे सिंह आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. यापूर्वी गुजरात आणि इंदूर येथून सिंह आणण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. मात्र, प्राण्यांच्या अदलाबदलीसह विविध कारणांमुळे हे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. आता महापौर रितू तावडे यांनी गुजरात दौऱ्यात या प्रस्तावाचा पाठपुरावा केल्याने सिंहांच्या आगमनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या आत मुंबईत चार आशियाई सिंह दाखल होतील, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे. सिंहांच्या वास्तव्यासाठी राणीबागेत सुमारे पाच हजार चौरस मीटर जागेवर आवश्यक निवासव्यवस्था पूर्ण झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सिंह आणण्याच्या घाईवर विरोधकांचा सवाल

मुंबईसह ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती असताना सिंह आणण्याची एवढी घाई कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याऐवजी सिंह आणण्यावर भर दिला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करून आणि विषयाची माहिती घेऊन बोलावे. त्यांच्या आरोपांना आता उत्तरे द्यावी, असे वाटत नाही. त्यामुळे सिंहांच्या आगमनाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here