Home महत्वाची बातमी राहुल गांधी आणि संजय राऊत हेच बहुमत चोरीच्या परंपरेचे जनक;  नवनाथ बन यांचा आरोप

राहुल गांधी आणि संजय राऊत हेच बहुमत चोरीच्या परंपरेचे जनक;  नवनाथ बन यांचा आरोप

0
राहुल गांधी आणि संजय राऊत हेच बहुमत चोरीच्या परंपरेचे जनक;  नवनाथ बन यांचा आरोप

गोकुळ सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा संदर्भ देण्याऐवजी राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्रात नेमके काय घडले होते, हे देशासमोर मांडावे, असा टोला भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. गुरुवारी भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत दिले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, याबाबत कोणालाही शंका नव्हती, असे बन म्हणाले. मात्र काँग्रेसला केवळ ४० ते ४२ जागा मिळाल्या असतानाही राहुल गांधी यांचा पक्ष सत्तेत सहभागी झाला. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि संजय राऊत यांनी एकत्र येऊन बहुमत चोरण्याचे काम केले. त्यामुळेच राहुल गांधी आणि संजय राऊत हेच या परंपरेचे खरे जनक आहेत, असा आरोप त्यांनी केला.

गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपला हरवले, पण सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला उत्तर देताना बन म्हणाले, इंदिरा गांधी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन त्यांची निवडणूक अवैध ठरवल्यानंतर देशात आणीबाणी लादण्यात आली होती. हा काँग्रेसचा इतिहास आहे. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी आणीबाणी लावून विरोधकांना दोन-दोन वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह जनसंघाच्या हजारो नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते, असे बन यांनी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/11/05/moving-towards-the-future-of-manufacturing-in-maharashtra-production-of-the-glc-begins-in-chakan-find-out-the-price-and-features/

महाराष्ट्राचे राजकारण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, म्हणूनच जनतेने त्यांना २०१४ मध्ये मुख्यमंत्री केले. २०१९ मध्ये बहुमत दिले आणि २०२४ मध्येही बहुमत दिले. त्यामुळेच ते आज महाराष्ट्राचे नायक म्हणून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत, असे बन म्हणाले. संजय राऊत यांचे नेते उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘एक तर तू राहशील किंवा मी राहीन’, असे म्हटले होते. मात्र महाराष्ट्रातील जनतेने फडणवीस यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारले. असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेने घरी बसवले. हा महाराष्ट्राचा इतिहास संजय राऊत यांनी वाचावा आणि मगच फडणवीस यांच्यावर टीका करावी, असा सल्ला बन यांनी दिला.

२०२९ मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार 

संजय राऊत यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करावा, असे सांगत बन म्हणाले, ट्रम्प पहिल्यांदा गेले तेव्हाही असेच म्हटले जात होते की, ट्रम्प गेले, आता मोदीही जातील. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ओबामांनंतर डोनाल्ड ट्रम्प आले, तरी मोदी पंतप्रधान राहिले. ट्रम्प गेले, जो बायडेन आले, तरी मोदी पंतप्रधान राहिले. बायडेन गेले आणि पुन्हा ट्रम्प आले, तरी मोदी पंतप्रधानपदी कायम राहिले. आता ट्रम्प जाऊन आणखी कोणी आले, तरी देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदीच करतील, असा दावा बन यांनी केला. बराक ओबामा, ट्रम्प, जो बायडेन, पुन्हा ट्रम्प आणि यानंतर येणारा पाचवा राष्ट्राध्यक्ष येईपर्यंत देशाच्या राजकारणात मोदींचा प्रभाव कायम राहील. २०२९ मध्येही जनता मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवेल आणि चौथ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here