हैदराबाद : तेलंगणा पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करून त्यांची बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. हैदराबादच्या बाहेरील भागात भाड्याच्या घरात सुरू असलेल्या या रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 6 कोटी 78 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य तीन आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे, टोळीचा मुख्य आरोपी युट्यूब आणि सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून बनावट नोटा तयार करण्यास शिकल्याचे तपासात समोर आले आहे.
कारवाईदरम्यान कारमधून 8 लाखांच्या बनावट नोटा जप्त
1 नोव्हेंबर रोजी अब्दुल्लापुरमेट पोलिस आणि शादनगर स्पेशल ऑपरेशन्स टीमने (SOT) रामोजी फिल्म सिटी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर एका कारला अडवले. या कारची तपासणी केली असता पोलिसांना 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. त्यांची किंमत सुमारे 8 लाख रुपये होती. याप्रकरणी कारमधील चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीचा छपाईचा अड्डा कुंटलूर परिसरातील एका भाड्याच्या घरात असल्याचे उघड झाले. या ठिकाणी छापा टाकला असता 500 रुपयांच्या बनावट नोटांचे आणखी 134 बंडल जप्त करण्यात आले. त्यांची किंमत सुमारे 6 कोटी 70 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
View this post on Instagram
युट्यूब व्हिडिओ पाहून शिकला बनावट नोटा तयार करण्याचा प्रकार
फ्युचर सिटीचे पोलीस आयुक्त डॉ. तरुण जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मदुपोजू कर्नाकर याने युट्यूब व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील कंटेंट पाहून बनावट नोटा तयार करण्याची पद्धत शिकल्याचा आरोप आहे.तपासानुसार, आरोपीने खऱ्या 500 रुपयांच्या नोटांचे स्कॅनिंग करून फोटोशॉपसारख्या इमेज एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यात बदल केले. त्यानंतर प्रिंटरच्या साहाय्याने बनावट नोटा छापल्याचा आरोप आहे.
https://www.prahaar.in/2026/11/05/cyber-fraudsters-swindle-%e2%82%b95-44-lakh-bank-directed-to-provide-reimbursement/
एक लाखांच्या बदल्यात 3 ते 4 लाखांच्या बनावट नोटांचे आमिष
बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आरोपींनी वेगळीच योजना आखली होती. प्रत्येक एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात तीन ते चार लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष ते संभाव्य ग्राहकांना दाखवत होते. मात्र, या व्यवहाराला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आरोपींनी फसवणुकीचा दुसरा मार्ग निवडल्याचे पोलिस तपासात समोर आले.
पोलिस असल्याचे भासवून ग्राहकांना लुटले
संभाव्य ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपी सुरुवातीला खऱ्या नोटा दाखवत होते. त्यानंतर बनावट पोलीस ओळखपत्रे, वॉकी-टॉकी, नकली पिस्तुले आणि बनावट नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा वापर करून ते स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवत होते.यानंतर ग्राहकांना धमकावून त्यांच्याकडील खरे पैसे घेऊन आरोपी घटनास्थळावरून पळ काढत असल्याचे तपासात उघड झाले आहे. अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपींनी दोन लाख आणि तीन लाख रुपये मिळून एकूण पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
चौघांना अटक, तिघांचा शोध सुरू
या प्रकरणात पोलिसांनी मदुपोजू कर्नाकर, चिन्नोळा माणिक्य रेड्डी, चेरुकुपेल्ली रत्नाकर रेड्डी आणि करणम अजय कुमार या चार आरोपींना अटक केली आहे. अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.छाप्यादरम्यान पोलिसांनी प्रिंटर, स्कॅनर, लॅपटॉप, लॅमिनेशन मशीन आणि नोटा कापण्यासाठी वापरली जाणारी उपकरणेही जप्त केली आहेत. या संपूर्ण रॅकेटमागील इतर व्यक्ती आणि आर्थिक व्यवहारांचा तपास पोलीस करत आहेत.