Gold Price Fluctuation: गेल्या काही काळातील घडामोडींमुळे सोन्याच्या भावात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक जणांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात इन्व्हेस्ट केले होते. त्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले होते, मात्र आताच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याचे दर अत्यंत संवेदनशील आणि चढ-उताराचे झाले आहेत. भारतातील सोन्याची एकूण मागणी यावर्षी सहा वर्षांतील अतिशय खाली येऊन पोहोचू शकते. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे लोक दागिने खरेदी करण्यापासून दूर होत आहेत, तर दुसरीकडे गुंतवणुकीसाठीची खरेदीदेखील कमकुवत झाली आहे. भारतातील सोन्याची मागणी 2026 मध्ये सुमारे 650 मेट्रिक टनांपर्यंत कमी होऊ शकते. तसेच कमी पाऊस आणि ग्रामीण भागातील घटते उत्पन्न यांचाही सोन्याच्या खरेदीवर परिणाम होत आहे, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, याचा थेट परिणाम ग्राहकांच्या भावनांवर होत आहे. वाढत्या किमतींमुळे लोक दागिने खरेदी करण्यापासून परावृत्त होत आहेत.
मंगळवारी प्रदर्शित करण्यात आलेल्या एका अहवालात, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने अशी शक्यता वर्तवली आहे की, 2026 मध्ये भारतातील सोन्याची मागणी सुमारे 650 मेट्रिक टनपर्यंत पोहोचू शकते. 2020 नंतरची ही सर्वात कमी मागणी असेल. 2020 मध्ये, कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाला, ज्याचा सोन्याच्या खरेदीवर मोठा परिणाम झाला.
तसेच सप्टेंबरच्या तीन महिन्यांपर्यंच्या आकडेवारीतही सोन्याच्या खरेदीतील घट ठळकपणे दिसून आली. जुलै ते सप्टेंबर दरम्यान, भारतातील सोन्याची मागणी वार्षिक तुलनेत सरासरी 29 टक्क्यांनी घसरून 162.5 मेट्रिक टन झाली. याच काळात दागिन्यांची खरेदी 20 टक्क्यांनी घटली, तर गुंतवणुकीसाठीच्या सोन्याची मागणी 40 टक्क्यांनी कमी झाली. याचा अर्थ असा की, केवळ दागिने खरेदी करणारेच नव्हे, तर गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांनीही या काळात खरेदी करणे थांबवले.
सोन्याच्या मागणीत घट होण्याचे मुख्य कारण सोन्याच्या वाढलेल्या किमती हे आहे. तसेच इराण युद्धापासून महागाई वाढली आहे, ज्यामुळे कौटुंबिक बजेटवर ताण येत आहे आणि लोक पूर्वीप्रमाणे सोन्यावर जास्त खर्च करू शकत नाहीत. परिणामी, सोन्याच्या वाढलेल्या किमतीचा विशेषतः दागिन्यांच्या खरेदीवर परिणाम होत आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे, अनेक ग्राहक खरेदी पुढे ढकलत आहेत किंवा पूर्वीपेक्षा कमी वजनाचे दागिने खरेदी करत आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/03/tiger-shroff-news-mumbai-crime-branch-arrests-22-year-old-woman-in-tiger-shroff-shooting-case-number-of-accused-increases/
ग्रामीण भागात लोक दागिने केवळ घालण्यासाठीच नव्हे, तर बचत आणि संपत्तीचे प्रतीक म्हणूनही खरेदी करतात. त्यामुळे भारतातील सोन्याच्या एकूण मागणीपैकी निम्म्याहून अधिक मागणी ही ग्रामीण भागातून येते. मात्र, या वर्षी कमी पावसामुळे ग्रामीण मागणीसमोर एक आव्हान उभे राहिले आहे. 2026 मधील पावसाचे प्रमाण हे गेल्या दशकातील सर्वात कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम कृषी उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे. जेव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते, तेव्हा सोने आणि दागिन्यांसारख्या वस्तूंवरील खर्चही कमी होऊ शकतो.
यात एक आशेची बाब म्हणजे, मागणी कमी असूनही, दिवाळी आणि लग्नसराईच्या काळात सोन्याची खरेदी वाढू शकते. दिवाळी आणि धनतेरसच्या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय, लग्नसमारंभांमध्ये दागिन्यांची खरेदीही वाढते. तरीदेखील, सोन्याच्या वाढलेल्या किमती आणि कमकुवत ग्रामीण अर्थव्यवस्था या मागणीला मर्यादित करू शकतात. याचा अर्थ असा की, सण आणि लग्नसराईमुळे मागणीला वाढत असेल असं वाटत असलं तरी, वर्षभरात झालेली घट भरून काढणे कठीण होऊ शकते.