बंगालच्या उपसागरात घोंघावणारे ‘मुरासू’ (Murasu) हे चक्रीवादळ आता अधिकच भीषण रूप धारण करत असून, वेगाने किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. या वादळाचा मुख्य आणि सर्वाधिक धोका आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला बसणार आहे. परंतु, याचा प्रभाव केवळ दक्षिण भारतापुरता मर्यादित नसून, अरबी समुद्रातील बदललेल्या हवामानामुळे महाराष्ट्रातील हवामानातही मोठा बदल झाला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
महाराष्ट्रात १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान पावसाचे सावट
हवामान खात्याच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच ५ तारखेपर्यंत राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण राहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. यावेळी ताशी ३० ते ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहतील असा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः आज (३ नोव्हेंबर) रोजी मराठवाड्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर ४ नोव्हेंबर रोजीही काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘मुरासू’ चक्रीवादळाचे धडकणे सुरू
https://www.prahaar.in/2026/11/03/major-rescue-operation-by-the-indian-navy-in-the-arabian-sea-20-sailors-rescued-from-the-clutches-of-somali-pirates/
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अत्यंत तीव्र स्वरूपात आलेले हे ‘मुरासू’ चक्रीवादळ आज मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले (Landfall) आहे. वादळाचा हा लँडफॉल प्रक्रियेचा काळ अजूनही सुरू असून, यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ११ कोटी ते तब्बल १२० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या महाभयंकर चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे दक्षिण भारतातील तब्बल ५ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान धडकले वादळ
हवामान तज्ज्ञांच्या मते, हे वादळ प्रामुख्याने आंध्र प्रदेशमधील नेल्लोर आणि नरसापूर या किनारपट्टीच्या परिसरादरम्यान धडकले आहे. या चक्रीवादळाने गेल्या काही तासांत पश्चिम-वायव्य दिशेने आपला प्रवास केला आहे. या तीव्र हवामान प्रणालीचा परिणाम केवळ दक्षिण भारतावरच नाही, तर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहार या राज्यांवरही झाला असून, तेथेही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय ईशान्य भारतातील काही राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
कोणत्या राज्यांत किती पावसाचा इशारा ?
आंध्र प्रदेश: किनारपट्टीचा भाग आणि रायलसीमा परिसरात सलग दोन दिवस अतिमुसळधार पाऊस पडेल.
तेलंगण: मंगळवारी दिवसभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू राहील.
तमिळनाडू: आगामी ७ नोव्हेंबरपर्यंत राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
ओडिशा: ४ नोव्हेंबरपर्यंत काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
केरळ: ७ आणि ८ नोव्हेंबरदरम्यान काही ठिकणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल.