Latur News: लातूर शहरात कुरिअरची पार्सल घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. कुरिअरचे बॉक्स वाहनातून खाली उतरवले जात असताना हा स्फोट झाला. या घटनेत टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून, एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
https://www.prahaar.in/2026/10/31/sensation-in-pimpri-chinchwad-decomposed-body-of-a-young-woman-who-returned-from-london-found-in-a-luxury-flat/
पार्सल उतरवताना अचानक झाला स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, कुरिअरच्या वाहनातून पार्सल खाली उतरवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की टेम्पोचे मोठे नुकसान झाले. वाहनातील तसेच परिसरातील काही वस्तूंचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित पार्सलमध्ये ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटक सामग्री होती का, याचा तपास केला जात आहे. पार्सल कुठून पाठवण्यात आले होते आणि त्यामध्ये नेमके काय होते, याची माहितीही तपास यंत्रणा घेत आहेत.
टेम्पोत बंदूक आढळल्याने तपासाला वेग
घटनेची माहिती मिळताच लातूर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, कुरिअरच्या टेम्पोमध्ये एक बंदूकही आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
टेम्पोमध्ये आढळलेली बंदूक कोणाची आहे, ती वाहनात कशी आली आणि स्फोटाशी तिचा काही संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे. कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण, पार्सलचा स्रोत आणि बंदुकीबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाच्या तपासानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे.