शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी मुंबई आणि उपनगरातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला, तर शहरभर अंशतः ढगाळ वातावरण कायम होते. किमान तापमान हे नेहमीपेक्षा जास्त होते. कुलाबा येथे २७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे नेहमीपेक्षा २.९ अंशांनी जास्त होते. शनिवारी सकाळी नोंदवलेल्या हवामानाच्या माहितीनुसार, सांताक्रूझमध्ये किमान तापमान २५.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे नेहमीपेक्षा २.९ अंशांनी जास्त होते.
भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांच्या तुरळक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भाच्या काही भागांमध्ये वाऱ्याचे झोत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहू शकतात. मुंबईत दिवसाला उच्च तापमानाची नोंद सुरूच आहे. शनिवारी शहरात अंशतः ढगाळ आकाश, काई भागांमध्ये पाऊस आणि सरासरीपेक्षा जास्त किमान तापमान अशी हवामानाची स्थिती होती.
https://www.prahaar.in/2026/10/31/schedule-for-the-2027-census-announced-to-begin-on-this-date-with-registration-delayed-in-some-states/
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ अपवर दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ६२ नोंदवण्यात आला. भारताच्या राष्ट्रीय AQI वर्गीकरणानुसार, ५१ ते १०० दरम्यानचे आकडे समाधानकारक मानले जातात. तर १०१ ते २०० पर्यंतचे आकडे मध्यम श्रेणीत येतात. त्यामुळे शहरव्यापी आकडा समाधानकारक श्रेणीतच राहिला. तथापि, अनेक निरीक्षण केंद्रांवर हवेच्या गुणवत्तेची पातळी मध्यम श्रेणीत नोंदवली गेली. मालाड आणि माझगाव या दोन्ही ठिकाणी १०४ तर शिवाजी नगरमध्ये १०३ हवेच्या गुणवत्तेची नोंद झाली. शहरच्या इतर भागांमध्ये कमी नोंद झाली. वरळीमध्ये ५७, तर घाटकोपरमध्ये ६१ आणि अंधेरीमध्ये ८६ AQI नोंदवला गेला. हे तिन्ही आकडे समाधानकारक श्रेणीत राहिले.