Maharashtra Weather News: राज्यात एकीकडे ऑक्टोबर हिटचा चटका जाणवत असताना दुसरीकडे पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 28 ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
https://www.prahaar.in/2026/10/28/do-not-use-pollution-causing-firecrackers-opt-for-green-firecrackers-instead-municipal-commissioner-ashwini-bhides-appeal/
मुंबईसह कोकणात कसे राहणार हवामान?
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 29 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आल्याचे अंदाजात नमूद आहे.
उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. या भागांत वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा
पुणे शहर आणि घाटमाथ्याच्या परिसरात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण जाणवू शकते. दुसरीकडे कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.
विदर्भात गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट
विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत कोणताही अलर्ट नसल्याचे दिलेल्या अंदाजात नमूद आहे. मात्र, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
ऑक्टोबर हिटमुळे उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा ताजा अंदाज तपासावा. वादळी वारे आणि जोरदार पावसाच्या वेळी झाडांखाली किंवा कमकुवत बांधकामांच्या जवळ थांबणे टाळावे.